छत्रपती संभाजीनगर : अवैधरीत्या कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ८६ गोवंशांची सिटी चौक पोलिसांनी छापा मारत सुटका केली. चार जूनला सायंकाळी किले अर्क आणि जलाल कॉलनी भागात चार ठिकाणी छापे मारत ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. २० लाख रुपये किमतीचे हे गोवंश आहेत. पहिल्या कारवाईत पोलिसांनी किले अर्क भागातील मशीदच्या पाठीमागे असलेल्या वाड्यावर छापा मारला. यावेळी काळ्या ताडपत्रीआड जनावरे लपवलेल्या अवस्थेत मिळून आली. पोलिसांनी या जनावरांची सुटका करीत त्यांना ताब्यात घेतले.
पंचनामा करीत या गोवंशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेत पाठविण्यात आले. ही जनावरे डांबून ठेवणारे संशयित आरोपी मिर्झा अनिस बेग मिर्झा हमीद बेग,(वय ३४, रा. रोहिला गल्ली, सिटी चौक) आणि नदीम खान नईम खान,(वय ३०, रा. हिमायत बाग) यांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणावरून ७२ गोवंशांची सुटका करण्यात आली.
दुसरी कारवाई कर्करोग रुग्णालयाकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी इस्तियाक बाबूमियाँ कुरेशी याच्या पडक्या जागेत करण्यात आली. या ठिकाणावरून सहा गोवंशांची सुटका करण्यात आली असून, इस्तियाक कुरेशीला ताब्यात घेण्यात आले आहे.
तिसऱ्या कारवाईत चित्तेखाना कब्रस्तान येथून दोन गोवंशांची सुटका करण्यात आली; तसेच चौथ्या कारवाईत इस्तियाक कुरेशी याच्या जलाल कॉलनी भागातील जागांवरून सहा गोवंशांची सुटका करण्यात आली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सिटी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, मंगेश जगताप, पीएसआय अर्जुन कदम, कोळेकर, भागवत मुठाळ, निवृत्ती गायके, विठ्ठल शिंदे, फुके, राजेंद्र साळुंके, मुनीर पठाण, मिलिंद इप्पर, पवार, सदावर्ते, डंबाळे व शिंदे आदींनी केली.