Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
Saam TV June 05, 2025 07:45 PM

Nashik car accident, Kalwan Fata crash : नाशिकमध्ये कळवण फाट्याजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण कार अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकहून सटाण्याकडे जाणारी कार भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बंगल्यावर जाऊन आदळली. अपघात इतका भयानक होता की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एका चिमुकलीसह अन्य दोघांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झालेले सर्वजण देवळा येथील रहिवासी असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण नाशिक येथील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहून परतत होते. कळवण फाट्याजवळ हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने आणि नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र कारमधील सर्व वाचवणे शक्य झाले नाही.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत ३ मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. इतर जखमींना पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तीन जणांनी प्राण सोडले. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.