Crime News : गुगल मॅपवरून मंदिर शोधून चोरी, तंत्रज्ञानाद्वारे पुरातन मंदिरावर टोळीचा डोळा
esakal June 06, 2025 01:45 AM

नाशिक- जिल्ह्यातील पुरातन व असुरक्षित मंदिरे शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करून त्यातील मौल्यवान ऐवज चोरी करणाऱ्या अट्टल घरफोड्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीचा म्होरक्या यांत्रिक अभियांत्रिकी (मॅकेनिकल इंजिनिअरिंग) चा विद्यार्थी असून, त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सात मंदिरांमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

या टोळीत सुयोगसह संदीप ऊर्फ शेंडी निवृत्ती गोडे (२३, रा. टिटवाळा, कल्याण) आणि अनिकेत अनिल कदम (२१, रा. आरकेनगर, कल्याण, जि. ठाणे) यांचा समावेश आहे. यातील दोन संशयित संदीप साबळे (अकोले) आणि दीपक पाटेकर (कल्याण) फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत संशयितांना जेरबंद केले. या टोळीने सिन्नरमधील ५, वाडिवऱ्हेतील १ आणि लासलगावमधील १ मंदिरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पुण्यातून सुयोगला, तर कल्याण येथून उर्वरित दोघांना अटक करण्यात आली.

लाखोंचा ऐवज जप्त

पोलिसांनी नांदूर शिंगोटे परिसरातील शेडमध्ये लपवलेल्या चोरीच्या मालाचा जप्ती केली. यात चांदीचा मुकुट २३८ ग्रॅम (२७ हजार रुपये), चांदीच्या प्लेट १ किलो (१ लाख रुपये), पितळी कळस २० किलो, समई ३ मोठ्या, १ लहान, पितळी घंटा ६, पितळी घोडा १ एकूण वजन ६६ किलो, किंमत: १ लाख ९३ हजार २९० रुपये यांचा समावेश आहे.

पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

ही कामगिरी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र मगर आणि त्यांच्या पथकाने केली. पथकात सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, संदीप नागपुरे यांचा समावेश होता.

तंत्राज्ञानाद्वारे पुरातन मंदिरांवर डोळा

मुख्य संशयित सुयोग अशोक दवंगे (२१, रा. हिरवगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याने गुगल मॅपद्वारे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंदिरे शोधली. त्यानंतर दिवसा मंदिराची पाहणी करून रात्री मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरण्याचा कट रचण्यात आला. कुलूप तोडण्यासाठी युट्युबवरून व्हिडिओ पाहून तंत्र शिकले आणि हायड्रोलिक कटरचा वापर केला जात होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.