बंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अकराजणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सीसीबी आणि कब्बन पार्क पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ‘आरसीबी’चे विपणन प्रमुख निखिल सोसाळे आणि अन्य चार कार्यक्रम आयोजकांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींत ‘डीएनए मॅनेजमेंट’ चे कर्मचारी सुनील मॅथ्यू, किरण आणि सुमंत यांचाही समावेश आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या या दुघटनेप्रकरणी आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट मंडळ आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘डीएनए’विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. देवनहळ्ळी येथील केम्पेगौडा विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. हे चौघेही मुंबईला जात होते त्याचवेळी त्यांना अटक केली. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, दुर्घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारने गुरुवारी पाच पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज यांनाही कार्यमुक्त करण्यात आले. गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर यांचीही बदली केली आहे.
सचिवांच्या घरावर छापाअधिकृत परवानगीशिवाय ‘आरसीबी’च्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या ‘केएससीए’चे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्या घरावर सीसीबी पोलिसांनी छापा घातला होता. अटकेच्या भीतीने हे दोघे आधीच पसार असल्याचे कळते.
चौघांना १४ दिवसांची कोठडीउच्च न्यायालयाने ‘आरसीबी’ आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ‘डीएनए’च्या कर्मचाऱ्यांसह चार संशयित आरोपींना १४ दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कब्बन पार्क पोलिसांनी ‘डीएनए’ चे संचालक सुनील मॅथ्यू, ‘डीएनए’ चे व्यवस्थापक किरण, कर्मचारी सुमंत आणि ‘आरसीबी’च्या विपणन विभागाचे प्रमुख निखिल सोसाळे यांना कोठडी ठोठावली आहे.