दोस्तीत कुस्ती… उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री काय
Marathi June 07, 2025 03:25 AM

नांदेड : संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र (मित्र) असे म्हणतात. मात्र, संकटात मदत केलेल्या मित्राला विसरणारे देखील काही मित्र असतात. अनेकदा मित्राला आर्थिक मदत करुन त्याची गरज भागवण्याचं काम मित्रामार्फत केलं जातं. त्यामुळेच, मैत्री या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, मित्राने केलेली मदत विसरुन, वेळेत त्याची परतफेड न करणे हा काहींचा ठायी स्वभाव असतो. अनेकदा मित्रांतील आर्थिक व्यवहारातून मैत्री संपुष्टात येते. आता, नांदेडमध्येही (Nanded) अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मित्राला उसने दिलेले पैसे वारंवार मागूनही तो परत देत नसल्याच्या रागातून ज्या मित्राने पैसे दिले होते, त्याने चक्क मित्राची इनोव्हा कारच जाळली आहे. याप्रकरणी नांदेड पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्राला उधार, हातउसने दिलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून मित्राने मित्राची इनोव्हा कार जाळल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. दिनेश ठाकूर नावाच्या युवकाने मनजीत पवार या मित्राला 1.5 लाख रुपये हातउसने दिले होते. मात्र, वारंवार तगादा लावूनही मित्र काही केल्या पैसे परत करत नव्हता. मित्र दिनेश ठाकूरने केलेली मदत विसरुन पैसे परत देण्याचे नावही मनजीत पवार घेत नव्हता. या रागातून दिनेश ठाकूरने मनजीत पवार यांची नवा मोंढा भागातून नवी कोरी इनोव्हा कार घेऊन भोकर शहराचा रस्ता गाठला. भोकर शहराजवळ गेल्यानंतर इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून चक्क नवी इनोव्हा गाडी जाळून टाकली. विशेष म्हणजे ही इनोव्हा कार 18 लाख रुपयांची असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणी मनजीत पवार यांच्या तक्रारीवरून नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र, एका मित्राने मैत्री जपत दुसऱ्या मित्राला मदत केली. पण, दुसऱ्या मित्राने त्या मदतीची जाणीव न ठेवल्याने दोन मित्रांमध्ये आर्थिक व्यवहारातून कटुता निर्माण झाली. त्याच रागातून ही धक्कादायक घटना घडली अन् एका चांगल्या मैत्रीचा द एन्ड झाला.

हेही वाचा

अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.