पुणे, ६ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 स्पर्धेत तिसऱ्या दिवशी निकित धुमाळ (३-१४) याने केलेल्या अचूक गोलंदाजीसह मुर्तझा ट्रंकवालाच्या उपयुक्त ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजयी श्रीगणेशा केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो यशस्वी ठरला नाही. पुणेरी बाप्पाच्या जलदगती गोलंदाज निकित धुमाळने सुरेख गोलंदाजी करत पहिल्याच चेंडूवर प्रीतम पाटील(१)ला झेल बाद केले. त्याचा झेल रामकृष्ण घोषने टिपला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार अझीम काझीला त्रिफळा बाद करून सामन्यातील वैयक्तिक दुसरा बळी टिपला.
रत्नागिरी जेट्स संघ ३.५ षटकात २ बाद २० धावा अशा स्थितीत असताना पावसाचा व्यत्यय आला. पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरु झाला व हा सामना प्रत्येकी ८ षटकांचा करण्यात आला. धीरज फटांगरे आक्रमक फटका मारताना १५ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर निखिल नाईकने आक्रमक खेळी करत १३ चेंडूत ३१ धावा काढून संघाचा डाव पुढे नेला. त्यात त्याने १ चौकार व ३ षटकार खेचले. निखिल नाईकला निकित धुमाळने झेल बाद केले. दिव्यांग हिंगणेकर(नाबाद ८), किरण चोरमले (नाबाद २) यांनी संघाला ८ षटकात ५ बाद ६९ धावा उभ्या करून दिल्या.
विजयासाठी आवश्यक ६९ धावांचे आव्हान ४ एस पुणेरी बाप्पा संघाने ७ षटकात २बाद ७०धावा करून पूर्ण केले. सामन्यात यश नाहरने १२ चेंडूत २चौकारासह १८ धावा, तर मुर्तझा ट्रंकवालाने २० चेंडूत २ चौकार व २ षटकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. या सलामीच्या जोडीने २८ चेंडूत ४७ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले.
यश नाहर १८ धावांवर असताना जोरदार फटका मारताना विजय पावलेने त्याला झेल बाद केले. अझीम काझीने त्याचा सुंदर झेल टिपला. त्यानंतर मुर्तझा ट्रंकवाला आक्रमक फटका मारताना विजय पावलाच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद झाला. अखेर सूरज शिंदेने नाबाद ७, साहिल औताडेने नाबाद ६ यांनी संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलकरत्नागिरी जेट्स : ८ षटकात ५ बाद ६९धावा (निखिल नाईक ३१(१३,१x४,३x६), धीरज फटांगरे १५, निकित धुमाळ ३-१४, रोशन वाघसरे १-२४)
४ एस पुणेरी बाप्पा : ७ षटकात २बाद ७०धावा(मुर्तझा ट्रंकवाला ३२(२०,२x४,२x६), यश नाहर १८(१२,२x६), सूरज शिंदे नाबाद ७, साहिल औताडे नाबाद ६, विजय पावले २-११); सामनावीर - निकित धुमाळ.