Pune Fraud News : कर्जाच्या आमिषाने तरुणाची साडेदहा लाखांची फसवणूक
esakal June 07, 2025 03:45 AM

पुणे - व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाची दहा लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोथरूडमधील पौड रस्ता परिसरात सप्टेंबर २०२४ मध्ये घडला असून, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेल्या ३० वर्षीय तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन अशोक बोडखे (रा. चिखली), फायनान्स कंपनीतील मनीषा बनसोडे आणि तिचा एक सहकारी अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राप्त तक्रारीनुसार, या तिघांनी संगनमत करून तरुणाला बनावट इ-मेलद्वारे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून तरुणाने आरोपींच्या बँक खात्यांमध्ये साडेदहा लाख रुपये भरले. मात्र, कर्ज मंजूर करण्यात आले नाही आणि पैसेही परत केले नाहीत.

आरोपींनी ती रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचे तपासात उघड झाले आहे. पुढील तपास कोथरूड पोलिस करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.