Moshi Slaughter House: मोशीतला कत्तलखाना रद्द करुन गोशाळा होणार? पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी नेमकं काय म्हटलं?
esakal June 07, 2025 05:45 AM

Moshi Slaughter House: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर सर्वसामान्यांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मोशी येथील गावच्या हद्दीत कत्तलखान्यासाठी जागा आरक्षित केली आहे. याला स्थानिक नागरिक, हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विरोध केला.

दरम्यान, मोशी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्यात येईल आणि त्या ठिकाणी गोशाळा आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित कमिटीसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

मोशी हे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे गाव असून, इथं विविध धर्म, जाती आणि पंथाचे लोक शांततेने वास्तव्य करतात. अशा गावात कत्तलखाना सुरू केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा निर्णय आहे. तसेच, सार्वजनिक पर्यावरण, नागरी आरोग्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने सदर कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करावे आणि त्या ठिकाणी गोशाळा सुरू करावी. कारण, याच परिसरात मोशीचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री. नागेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ आहे.

या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भंडारा उत्सव साजरा केला जातो. तसेच, श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू यांच्यामध्ये मोशी गाव असून, वारकरी सांप्रदाय या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कत्तलखान्याचं आरक्षण रद्द करावे, अन्यथा मोशी ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.

याप्रकरणी स्थानिक भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले, "पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. ग्रामस्थ, स्थानिक नागरिक, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या हरकती-सूचना घेतल्या जात आहेत. त्यावर सुनावणीही होणार आहे. हा डीपी प्लॅन अद्याप अंतिम झालेला नाही. मोशी इथं कत्तलखाना कदापि होवू देणार नाही. त्याच ठिकाणी गोशाळा सुरू केली जाईल. याबाबत प्रशासनाकडे भूमिका मांडली आहे. भूमिपुत्र, शेतकरी, वारकरी सांप्रदाय आणि तमाम हिंदू बांधवांच्या मागणीप्रमाणे गोशाळा करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत"

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.