बीड : सासुरा (ता. केज) येथील संत एकनाथ महाराज मठ संस्थानमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता. सहा) आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून भजन गायले. तर, महाराजांसह विश्वस्तांनीही पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.
संस्थानचे अध्यक्ष रतन महाराज व सचिव सुशेन भोसले यांच्यावर दानपत्र, समाधी मंदिरातील सुविधा, हिशेब, उत्तराधिकारी बदलणे आदी १६ मुद्दे उपस्थित करत बुधवारपासून तुळशीराम घुगे, केशव गीते, प्रल्हाद पाळवदे, जनार्दन पाळवदे, मनोहर पाळवदे, शांताबाई पाळवदे, सुंदर पाळवदे, आबा पाळवदे, पांडुरंग पाळवदे, श्रीहरी ढाकणे, ओंकार पाळवदे, नारायण वायबसे, शारदा पाळवदे, गंगुबाई गायके, मधुकर पळवदे, आशाबाई जाधवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. शुक्रवारी काही आंदोलक सकाळी १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढले आणि त्यांनी टाळ वाजवून भजन गायले.
महाराजांकडूनही आरोपांना प्रत्युत्तरसंस्थानचे महंत रतन महाराज मुंडे यांचे वय शंभर वर्षांच्या जवळपास आहे. ग्रामस्थ आणि भक्तांच्या आग्रहाखातर इच्छा नसतानाही महाराजांनी केशव गीते यांना वारस म्हणून मठाधिपती नेमले. मात्र, उत्तराधिकाऱ्यांचे वर्तन चुकीचे असून गुरूंची सेवा करण्याऐवजी ते एका गटाला हाताशी धरून संस्थानचा कारभार हाती घेण्यासाठी मठाधिपती होण्याच्या महत्त्वाकांक्षेतून गुरूवर दबाव आणत आहेत.
त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही सुशेन भोसले यांनी केला. उतारवयात गुरू म्हणून माझी सेवा करण्याचे सोडून माझ्या विरोधात आपला वेगळा गट निर्माण करून मला दमदाटी केली जात असल्याचा आरोप रतन महाराज मुंडे यांनी करून आपल्या जीविताला धोका असल्याचेही ते म्हणाले.