मालाड पी पूर्व विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरणदिन साजरा
कांदिवली, ता. ७ (बातमीदार) ः मालाड पूर्व पी विभागामध्ये शिला रहेजा उद्यान, खडकपाडा येथे जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला. या वेळी माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, मराठी सिनेअभिनेता संदीप पाठक, सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक व अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.
वृक्षलागवडीचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपउद्यान अधीक्षक (परि. ४) सचिन अत्तरदे, सहाय्यक उद्यान अधीक्षक पी पूर्व अमोल इथापे व उद्यानविद्या सहाय्यक चैत्रा मावची यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्यानात जागेनुसार ताम्हण, बकुळ आणि नारळ या प्रजातींची रोपे लावली.
चिमुकली ठरली पर्यावरणदिनाचे आकर्षण
विशेष म्हणजे, एका चिमुकलीने हिरवा ड्रेस घालून झाडे तोडू नका, वन्य पशू-पक्ष्यांचे निवारे हिरावू नका, असा संदेश दिला. ही चिमुकली जागतिक पर्यावरणदिनाचे आकर्षण ठरली. या वृक्षांसाठी पोषक खत- मातीच्या मिश्रणाचा वापर केला. उद्यानात ताम्हण आणि बकुळ वृक्षांची संख्या वाढल्याने फुलांसह सुगंधित वातावरण आणि पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे चैत्रा मावची यांनी सांगितले.