पुणे - वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आरोपी नीलेश चव्हाण याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
वैष्णवी यांची सासू लता, नणंद करिष्मा आणि पती शशांक यांचे मोबाईल नीलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले आहेत. नीलेश चव्हाण व इतर आरोपींमध्ये मोबाईलच्या माध्यमातून झालेले संभाषण व मेसेज तपास जप्त करण्यात आले आहे.
वैष्णवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दिर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७), पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना न्यायालयाने यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने नीलेश याला शनिवारी (ता. ७) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
चव्हाणने बाळाशी कोणती गैरवर्तणूक केली आहे. नीलेश आणि इतर आरोपींमध्ये नेमके काय संभाषण झाले? चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील सदस्य यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यातून हा गुन्हा करण्यात आला आहे का? याचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात यावी, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची नोंदणी प्रत प्राप्त करण्यात आली आहे. शशांक आणि वैष्णवी हिचे मोबाईलमधील व्हॉटसअप चॅट स्क्रिनशॉट पोलिसांनी जप्त केले आहे. बचाव पक्षाकडून ॲड. स्वानंद गोविंदवार यांनी युक्तिवाद केला. मुळ फिर्यादी यांच्यावतीने ॲड. शिवम निंबाळकर कामकाज पाहात आहेत.