छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय. या मालिका म्हणजे प्रेक्षकांना विरंगुळा असतो. मालिकांचा विषय, त्यातील कथानक, मालिकांचे कलाकार हे सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं खूप गरजेचं ठरतं. नाहीतर त्या मालिका काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशाच काही मालिका यापूर्वीही अगदी ३ महिन्यात बंद झाल्यात. मात्र स्टार प्रवाह एकाहून एक उत्तम कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतंय. आता स्टार प्रवाहवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुन्हा भेटीला येणार आहे.
स्टार प्रवाहवर काही महिन्यांपूर्वीच काही नवीन मालिका सुरू झाल्यात. 'कोण होतीस ती काय झालीस तू' यासोबतच 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यासोबतच आता काही महिन्यातच आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम पेजवर या मालिकेच्या अभिनेत्रीची झलक शेअर करण्यात आलीये. या मालिकेचं नाव ठाऊक नसलं तरी या प्रोमोमध्ये एक अभिनेत्री दिसतेय. तिने ड्रेस घातला आहे. आणि ती गायीला गोंजारताना दिसतेय. या अभिनेत्रीचा चेहरा मात्र यात दिसत नाहीये.
हा प्रोमो शेअर करत स्टार प्रवाहने लिहिलं, 'तुमची लाडकी अभिनेत्री करतेय Star प्रवाहवर पुनरागमन!ओळखा पाहू कोण?' यावर नेटकऱ्यांनी या अभिनेत्रीला ओळखलं आहे. अनेकांच्या मते ही अभिनेत्री आहे समृद्धी केळकर. समृद्धी 'या फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून लोकप्रिय झाली होती. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. समृद्धी आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता ही अभिनेत्री खरंच समृद्धी आहे का हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.