Ashadhi Wari : श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे मलकापुरात आगमन;भाविकांकडून जोरदार स्वागत, दर्शनासाठी उसळली गर्दी
esakal June 08, 2025 06:45 PM

मलकापूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत मुक्ताबाई पालखीचे आज ता.७ जून रोजी विठ्ठलनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या निनादात विदर्भद्वारी मलकापूर नगरीत आगमन झाले. यावेळी भाविकांनी पालखीचे जोरदार स्वागत करून दर्शन घेतले.

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात सर्वात प्रथम प्रवेश करणारी श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने ६ जून रोजी कोथळी येथून प्रस्थान झाले. वारीची आणि आध्यात्मिक परंपरा असलेल्या आणि श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान असलेल्या मुक्ताईच्या पालखीमध्ये अनेक दिंड्यांचा सहभाग, रथ ओढणारी खिल्लारी बैलांची आकर्षक जोडी, रथाला करण्यात आलेला फुलांचा साज, विठ्ठल-रुखमाई आणि आदिशक्ती मुक्ताईमातेचा जयघोष करणारे शेकडो वारकरी, विदर्भ-खानदेश-मराठवाडा ते मध्यप्रदेशातील हजारो भाविकांची मांदियाळी, असा पायदळ वारीचा थाट आहे.

आज ७ जून रोजी या पालखी सोहळ्याचे विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर नगरीत आगमन होताच शहरवासीयांच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी हरिनामाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् मुक्ताबाईच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता.

यानंतर सदर पालखी ही मुक्ताईनगर रोड, तहसील चौक, हनुमान चौक, टी पॉइंट असे बुलडाणा रोडने टेलिफोन कॉलनी रोडमार्गे ढोल-ताशांच्या निनादात तसेच भक्तीमय वातावरणात अभंग व भजनांच्या तालावर मार्गस्थ झाली. सदर पालखीचे ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत स्वागत केले. आज पालखीचा मुक्काम हा छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालय येथे असून रविवार ८ जून रोजी सकाळी पालखी सोहळा हा शेलापूर मार्गे मार्गस्थ होणार आहे.

आदिशक्तीची पालखी राज्यातील सर्वात लांब पल्ल्याची पालखी आहे. खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर पार करत पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.

- रवींद्र महाराज हरणे,

पालखी सोहळा प्रमुख

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.