डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेतलं, ३ दिवस जंगलात कारमध्ये मृतदेह पडून; चिठ्ठीत आई-वडिलांची मागितली माफी
esakal June 08, 2025 06:45 PM

एमडीचं शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह तीन दिवसांनी कारमध्ये आढळून आला आहे. जोशुआ समराज असं डॉक्टरंच नाव असून तो तामिळनाडुच्या कोडाईकनाल इथला आहे. तो एमडीचं शिक्षण घेत होता तर मदुराईतील एका रुग्णालयात काम करत होता. त्याची कार कोडाईकनालजवळ पूमपराई इथं जंगलात तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी होती. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सगळा उलगडा झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डॉक्टरने आत्महत्या केलेल्या कारमध्ये सुसाइड नोट आढळून आली आहे. यात तरुणाने कुटुंबियांची माफीही मागितली आहे. माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये असं त्यात म्हटलं आहे. दरम्यान, सुसाइड नोटमध्ये आत्महत्येचं कारण सांगितलेलं नाही.

डॉक्टरच्या आत्महत्येनं तामिळनाडुत खळबळ उडाली आहे. डॉक्टरने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं होतं आणि ते फेडता येत नसल्यानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तर कुटुंबियांनी त्याच्या रिलेशनशिपमधील अडचणींमुळे त्यानं असं केलं असावं असं म्हटलंय.

डॉक्टर समराज कर्जात बुडाले होते असं समोर आलं आहे. पण नेमकं कोणतं कर्ज होतं आणि कशामुळे त्यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट नाही. ऑनलाइन गेमिंगमध्येही पैसे गमावल्याचा कयास लावला जात आहे. पोलिसांनी हे स्पष्ट केलं की सुसाइड नोटमध्ये असं काही आढळलं नाहीय. तसंच त्याच्या कुटुंबियांनीही कर्जाचा उल्लेख केला नाहीय. आम्ही अधिक तपास करत आहोत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.