69086
ध्येयपूर्तीसाठी हवी सकारात्मकता
आमदार नीलेश राणे ः सावंतवाडीत सकल मराठा समाजातर्फे गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करा. ध्येयपूर्तीचे वेड कायम मनात ठेवा. जिंकायचे असेल तर मनाने हरायचे नाही, खचायचे नाही. करियर निवडीसाठी आई-वडिलांची मते विचारात घ्या. आपल्या मनाचेही ऐका. आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करा, असे आवाहन कुडाळ मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनी केले.
सकल मराठा समाज सावंतवाडी यांच्या वतीने विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सत्कार सोहळा येथील भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. आमदार राणे यांच्या हस्ते विद्यार्थी व विविध क्षेत्रात योगदान दिलेल्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगरसेवक खेमराज कुडतरकर, आंबोली शिवसेना विभाग प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, प्रा. सतीश बागवे, प्रसाद परब, केसरी सरपंच राघोजी सावंत उपस्थित होते.
संजू परब म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय जीवनाला आमदार राणे यांनी उभारी दिली. गेली सोळा वर्षे मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’
प्रास्ताविकात अध्यक्ष गावडे यांनी सकल मराठा समाज या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी डॉ. लवू सावंत, सूरज लाड, सातोळी बावळट सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्नील परब, संतोष सगम, एकनाथ दळवी (विलवडे), क्रीडा प्रशिक्षक अरुण घाडी, गोरक्षक दिनेश गावडे, राघोजी सावंत, देवसू येथील मंथा सावंत, सोनू दळवी, दोडामार्ग प्रवीण गवस, सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस (दोडामार्ग), हनुमंत सावंत (देवसू), साईश गावडे, वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, दीपेश शिंदे, नंदकिशोर दळवी (विलवडे), पांडुरंग गावडे (चौकुळ), प्रा. सतीश बागवे, आस्था लोंढे, दिनेश गावडे (चौकुळ) तसेच आरोग्यदूत धोंडी अनावकर, संतोष जाधव, तुकाराम जाधव, सुनील पाटील, अजय कदम यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन व आरोग्यदूतांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. जय भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
---
सकारात्मक विचाराने यशस्वी व्हा!
आमदार राणे म्हणाले, ‘‘आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक विचार कायम ठेवले पाहिजेत. जीवनात कधीही खचायचे नाही. समाजाचे आपण देणे लागतो, हे कायम लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गडकिल्ले यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला अद्यापही माहीत नाहीत. त्यामुळे महाराजांचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे.’’