वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाचा बहुप्रतिक्षित अंतिम सामना बुधवारपासून खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल दोन क्रमांकावर राहिलेले दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लॉर्ड्सवर होणार असून आता विजेतेपद कोण मिळवणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
ऑस्ट्रेलिया त्यांचे विजेतेपद राखण्यासाठी या खेळणार आहे. त्यांनी २०२३ मध्ये भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद जिंकले होते.
तसेच दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार असून ते वरिष्ठ स्थरावर पहिले आयसीसी विजेतेपद मिळवण्यासाठी खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व तेंबा बवूमा करणार आहे.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवूड प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना कोणताही अंतिम सामना गमावलेला नाही, तर तेंबा बावूमाने कर्णधार म्हणून कसोटीत पराभव अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे आता यातील कोणती साखळी तुटणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना?ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात होणारा सामना ११ ते १५ जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १६ जून हा राखीव दिवस देखील आहे. हा सामना इंग्लंडमधील खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत १२ सामन्यांमध्ये ८ विजय आणि ३ पराभव स्वीकारले होते. तसेच १ सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे त्यांचे १०० गुणांसह विजयी टक्केवारी ६९.४४ होती. तसेच ऑस्ट्रेलियाने १९ सामने खेळताना १३ विजय मिळवले, तर ४ पराभव स्वीकारले. २ सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे त्यांचे १५४ गुणांसह ६७.५४ टक्के अशी विजयी टक्केवारी राहिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अव्वल क्रमांकावर, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
किती आहे विजेता आणि उपविजेत्यांची बक्षीस रक्कम?आयसीसीने यापूर्वीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ साठी मोठ्या बक्षीस रक्कमेची घोषणा केली होती. मागील दोन पर्वांपेक्षा यंदा आयसीसीने बक्षीस रक्कमेत जवळपास दुप्पटीने वाढ केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्या संघाला ३.६ मिलियन डॉलर (जवळपास ३१ कोटी रुपये) मिळणार आहेत, तर उपविजेत्याला २.१६ मिलियन डॉलर (जवळपास १८ कोटी रुपये) मिळणार आहेत.
कुठे पाहाता येणार लाईव्ह सामनादक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ चा अंतिम सामना भारतातही लाईव्ह पाहाता येणार आहे. भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर हा सामना लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच जिओस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरीही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.
दोन्ही संघ - दक्षिण आफ्रिका:टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, एडेन मार्करम, तेंबा बावूमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, वियान मुल्डर, मार्को यान्सिन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी
ऑस्ट्रेलिया:उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, जोश हेझलवुड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मॅट कुहनेमन
राखीव खेळाडू: ब्रेंडन डॉगेट