MPL 2025: ईगल नाशिक टायटन्सचा विजयाचा चौकार, रोहन दामले ठरला तारणहार
Marathi June 11, 2025 05:24 AM

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (10 जून) अखेरचा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स असा खेळला गेला. सायंकाळच्या सत्रात झालेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 150 धावांचा यशस्वी पाठलाग करत स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला. अष्टपैलू रोहन दामले याचे अर्धशतक निर्णायक ठरले.

गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने नाणेफेक जिंकून पुणे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मागील सामन्याचा मानकरी यश नाहर या सामन्यात अपयशी ठरला. मात्र, इतर सर्व फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मुर्तझा ट्रंकवाला याने 33 तर कर्णधार यश क्षीरसागर याने 34 धावा केल्या. अनुभवी नौशाद शेख (20) व सुरज शिंदे (26) यांनी खालच्या क्रमांकावर काही मोठे फटके खेळत संघाला 149 पर्यंत नेले. नाशिक संघासाठी वेगवान गोलंदाज मनोज इंगळे व मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

आपला चौथा विजय मिळवण्यासाठी नाशिक संघाला 150 धावांचे आव्हान होते. मात्र, त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज केवळ 25 धावांमध्ये माघारी परतले. अथर्व काळे व कौशल तांबे हेदेखील फारसे योगदान देऊ शकले नाहीत. मात्र, अनुभवी अष्टपैलू रोहन दामले एका बाजूने उभा राहिला. त्याने रणजीत निकम याच्यासह अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी अखेरपर्यंत नाबाद राहत आपल्या संघाला विजयी रेषा पार करून दिली. नाबाद अर्धशतक करणाऱ्या रोहन दामले याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या विजयासह ईगल नाशिक टायटन्सने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. तर, दुसरीकडे पुणेरी बाप्पा देखील आपल्या दुसऱ्या स्थानी कायम आहे. गत विजेता रत्नागिरी जेट्स दोन विजयासह तिसऱ्या स्थानावर असून, उर्वरित तीन संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.