पुणे - शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सुशील राजेंद्र हगवणे (वय-२८, रा. पौड रस्ता, कोथरूड; मूळ रा. भूकुम, ता. मुळशी) याला अटक केली. न्यायालयाने त्याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
याबाबत पोलिस हवालदार मंगेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील पल्लवी काशिद यांनी युक्तिवाद केला. आरोपी सुशील हगवणे याने प्रत्यक्षात त्या ठिकाणी वास्तव्य नसतानाही, पौड रस्त्यावरील एका पत्त्यावर बनावट भाडेकरार तयार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आली.
आरोपी सुशील हगवणे हा आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांचा दीर असून, त्या प्रकरणातही तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परवानगीने पोलिसांनी त्याला या नव्या प्रकरणात अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलिस करीत आहेत.