स्वतःचे बलस्थान ओळखा!
esakal June 11, 2025 10:45 AM

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

‘You will never change your life, until you change something you do. Secret of your success is found in daily routine.’

- Darren Hardy.

एक गोष्ट वाचली होती. एका शेतकरी पोल्ट्री फार्म चालवत होता. त्याला एके दिवशी, एका पक्ष्याचे जखमी अवस्थेतील पिल्लू सापडले. त्याने कोंबड्यांबरोबर याही पिल्लाचे संगोपन केले. औषधोपचार केले. कोंबड्यांबरोबर ते पिल्लू मोठे झाले. कोंबड्यांसारखे वागू लागले.

एक दिवस त्या शेतकऱ्याचा एक मित्र त्याला भेट द्यायला आलेला. तो त्या पक्ष्याच्या पिल्लाला बघून आश्चर्यचकित झाला. ‘‘अरे हा गरुड आहे! इथे आणि असा काय करतोय तो?’’

शेतकरी मित्राच्या परवानगीने तो त्या गरुडाला घेऊन एका डोंगराच्या उंच कड्यावर घेऊन गेला. हातावर घेऊन त्या गरुडाला त्याने समोरचा भव्य देखावा दाखवला. त्याने गरुड बसलेल्या हाताला जरा झटका दिला.

साशंक होऊन त्या गरुडाने जरा अस्वस्थ हालचाल केली आणि काही क्षणांत त्याने त्याच्या नैसर्गिक ऊर्मीनुसार पंख फडफडवले. उंच उभारले. त्याच्यातील आत्मविश्वास जागा झाला. आणि त्याने हाताला जोर देऊन उंच भरारी घेतली. त्या पक्षीराजाला कळले आपण गरुड आहोत. तो उंच आभाळात दिसेनासा झाला.

तात्पर्य - तुम्हाला कळावे लागते मी, कोण आहे? स्वत्व गवसावे लागते.

५S आणि ‘स्वॉक ॲनालिसिस’च्या सर्व लेखांमध्ये हेच सूचित केले होते. मला भेटलेला मिहीर, हृषीकेश यांना खूप लवकर किंवा थोड्या उशिराने स्वत्व गवसले. असाच एक स्वत्व गवसलेला तरुण भेटला. निहार, हा पण मित्राचाच मुलगा. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात मोठा झालेला.

पुण्यातील एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. नंतर नोएडा येथून एका प्रख्यात फिल्म अँड टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये एम.एस्सी. आणि पटकथा लेखनात पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केला आहे लेखनाकडे वळला.

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक व कवी यांच्या जोडीतील संगीतकाराबरोबर चित्रपटाच्या स्क्रिप्टचे लेखन केले. आता तो मागे वळून परत इंजिनिअरिंगकडे वळेल असे वाटत नाही. काही फिल्म्सच्या व दूरदर्शनवरील मालिकांच्या पटकथांचे व संवादांचे लेखन त्याने केले आहे. करतो आहे.

कौतुक निहारच्या आई-वडिलांचे. त्यांनी त्याच्या आवडीच्या व कौशल्य असलेल्या क्षेत्रात भरारी घेण्याचे मानसिक बळ दिले. आपल्या आजूबाजूला अशी हटके विचार करून तो अमलात आणणारी तरुण मंडळी भेटत असतात. त्यांना बळ देऊयात. खरेतर पालकांनाही प्रोत्साहित करायला हवे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.