30 हजार कोटीचा असणार करार : प्रणालीचे डीआरडीओ अन् सैन्याकडून यशस्वी परीक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्याला लवकरच एक नवी स्वदेशी हवाई सुरक्षा प्रणाली मिळणार आहे. या प्रणालीकरता 30 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याच्या अंतर्गत क्यूआर-एसएएम (क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाइल) सिस्टीम खरेदी करण्यात येतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषद चालू महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकतात. या मंजुरीला आवश्यकतेची स्वीकृती म्हणजेच एओएन म्हटले जाते.
क्यूआर-एसएएम सिस्टीम अत्यंत वेगाने काम करणारी स्वदेशी हवाई सुरक्षा प्रणाली आहे. ही प्रणाली शत्रूची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स 25-30 किलोमीटरच्या अंतरावरून अचूकपणे नष्ट करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. डीआरडीओ आणि सैन्याने मागील 3-4 वर्षांमध्ये क्यूआर-एसएएम सिस्टीमचे यशस्वी परीक्षण केले आहे. या प्रणालीला वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्याच्या दृष्टीकोनातून पडताळून पाहिले गेले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत डायनॅमिक्स या शासकीय कंपन्या क्यूआर-एसएएम सिस्टीम निर्माण करणार आहेत.
शत्रूला ट्रॅक करत नष्ट करण्यास सक्षम
क्यूआर-एसएएम सिस्टीम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येत असतानाही काम करू शकते. शत्रूला शोधत त्याला ट्रॅक करत त्याच्यावर ही प्रणाली हल्ला करू शकते. रणगाडे आणि भूदलाच्या वाहनांसोबत चालविण्याच्या दृष्टीकोनातून याची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे या प्रणालीला युद्धभूमीवर हवाईहल्ल्यांपासून वाचविता येणार आहे. सैन्याने हवाई सुरक्षा प्रणालीने (एएडी) ऑपरेशन सिंदूरदरम्यान प्रभावी कामगिरी केली होती. आता सैन्याला क्यूआर-एसएएमच्या 11 रेजिमेंट हव्या आहेत. तसेच स्वदेशी आकाश सिस्टीम देखील सैन्याच्या ताफ्यात सामील केली जात असून याची मारकक्षमता सुमारे 25 किलोमीटर आहे.
वायुदल, भूदलाची सुरक्षा प्रणाली होणार मजबूत
क्यूआर-एसएएम सिस्टीम उपलब्ध झाल्यावर वायुदल आणि भूदलाची वर्तमान हवाई सुरक्षा प्रणाली आणखी मजबूत होणार आहे. या प्रणालीत दीर्घ पल्ल्ल्याची रशियन एस-400 ट्रिम्फ क्षेपणास्त्रs आणि बरॅक-8 मध्यम पल्ल्याचे एसएएम (सरफेस टू एअर मिसाइल) सिस्टीम (70 किलोमीटर) सामील आहे. याचबरोबर रशियन इग्ला-एस क्षेपणास्त्रs (मारक पल्ला 6 किलोमीटर), एल-70 अँटी-एअरक्राफ्ट गन (3.5 किलोमीटरचा मारक पल्ला) आणि ड्रोन्सना ट्रॅक करत नष्ट करणारी स्वदेशी प्रणाली सैन्याच्या ताफ्यात सामील आहे.
मोठ्या योजनेवर काम
डीआरडीओ अत्यंत कमी पल्ल्याची हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणालीही विकसित करत आहे. याचा मारक पल्ला 6 किलोमीटर असणार आहे. तर गेमचेंजर ‘प्रोजेक्ट कुशा’ अंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या हवाई सुरक्षा प्रणालीचा मारक पल्ला 350 किलोमीटर इतका अधिक असणार आहे. ही प्रणाली भारत 2028-29 पर्यंत तैनात करण्याची योजना तयार करत आहे. संरक्षण मंत्रालयाने सप्टेंबर 2023 मध्ये वायुदलासाठी याच्या 5 स्क्वाड्रन्स खरेदी करण्यासाठी 21,700 कोटी रुपयांच्या एओएनला मंजुरी दिली होती.