एलोन मस्कची रोबोटॅक्सी ड्रायव्हरशिवाय धावणार, ‘या’ दिवशी रस्त्यावर उतरणार
GH News June 11, 2025 07:07 PM

टेस्लाच्या यशानंतर एलोन मस्क आता रोबोटॅक्सी घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे ही रोबोटॅक्सी ड्रायव्हरशिवाय धावणार आहे. याबाबत बोलताना टेस्लाचे सीईओ एलोन मस्क म्हणाले की, “आम्ही २२ जूनपासून सेल्फ-ड्राइव्ह रोबोटॅक्सीची सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे, लोक बऱ्याच काळापासून या सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत.सुरुवातीला ही सेवा ऑस्टिन, टेक्सास येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली जाणार आहे. पहिल्या १०-२० मॉडेल वाय कार रोबोटॅक्सी म्हणून वापरल्या जातील. रोबोटॅक्सी सुरु झाल्यानंतर ती मर्यादित क्षेत्रात चालेल, जिथे तिचे निरीक्षण केले जाणार आहे.”

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्टिनच्या रस्त्यांवर वाय रोबोटॅक्सीची चाचणी करण्यात आली आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रोबोटॅक्सीमध्ये कोणताही ड्रायव्हर नव्हता. चाचणीनंतर आता ही सेवा २२ जूनपासून सुरु होणार आहे.

रोबोटॅक्सीसमोरील आव्हाने

रोबोटॅक्सी ही सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावर काम करणार आहे. कारण सेल्फ-ड्रायव्हिंग फीचर्समुळे टेस्लाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे. मात्र रोबोटॅक्सी रस्त्यावर उतरवणे सोपे नाही. रोबोटॅक्सीच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झालेली आहे. त्यामुळे लोकांचा याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रोबोटॅक्सी सेवा कुठे सुरू होणार ?

एलोन मस्क यांनी सांगितले की, टेस्ला सध्या कॅलिफोर्नियासह इतर अमेरिकन राज्यांमध्ये रोबोटॅक्सी सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे, मात्र या भागात सेल्फ-ड्रायव्हिंग कारबाबत सर्वात कठोर नियम आहेत. मात्र टेस्ला आधीच ऑस्टिनमधील रस्त्यांवर आपल्या फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) सॉफ्टवेअरती चाचणी घेत आहे.

रोबोटॅक्सी कशी काम करते?

रोबोटॅक्सीला आपण सेल्फ-ड्रायव्हिंग टॅक्सी असे म्हणू शकतो. अशी वाहने सेन्सर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), नेव्हिगेशन सारख्या इतर तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हरशिवाय धावतात. सर्वप्रथम ही वाहने कॅमेरे आणि रडार सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सभोवतालच्या परिसराचा डेटा गोळा करतात. त्यानंतर एआयच्या मदतीने प्रवासाची योजना आखतात, आणि निर्धारित प्रवास पूर्ण करतात.

टेस्लाच्या आधी ‘या’ कंपनीने बनवली रोबोटॅक्सी

टेस्लाने विकसित केलेली ही रोबोटॅक्सी जगातील पहिली रोबोटॅक्सी नाही. याआधी अमेरिकन कंपनी झूक्सने अशी टॅक्सी बनवली होती. ही कंपनी नंतर अमेझॉनने विकत घेतली. सध्या अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये अमेझॉनच्या झूक्स रोबोटॅक्सीची चाचणी सुरु आहे. त्यामुळे ही कंपनी लास वेगास आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ही सेवा सुरु करण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.