पुणे पोलिसांकडून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. आता पुण्यातील प्रत्येक शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय शाळेच्या बसमध्ये महिला अटेंडंट असणे देखील अनिवार्ण राहणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने हे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उपसंचालक यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले काही निर्णय घेण्यात आले. आता प्रत्येक शाळेच्या बसमध्ये सुविधा असणे आवश्यक असणार आहे.
शाळेच्या बसमध्ये सहा आणि त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना ने-आण करण्याकरीता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. बसमधील वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी पोलीस पडताळणी करुन घेण्याचे आदेश आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
नियमांचे उल्लघंन केल्याचे आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाद्वारे १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान १ हजार ३२१ तसेच ६५० इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील ४१४ स्कूल बस व २०८ इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल ५५ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.