WTC 2025 Final: द. आफ्रिकेसाठी 'कैरी' आंबटच... ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी मुसंडी मारली, सामना रोमहर्षक वळणावर
esakal June 13, 2025 06:45 AM

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात होत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोनच दिवसात थरार पाहायला मिळत आहे. पहिल्या दोन्ही दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे कधी सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, तर कधी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

आता या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागण्याची शक्यता आहे. तरी दुसऱ्या दिवशी ऍलेक्स कॅरेने दिलेल्या लढतीमुळे ऑस्ट्रेलियाला २१८ धावांची आघाडी मिळाली आहे. आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया किती धावांचे लक्ष्य ठेवणार हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५७.१ षटकात १३८ धावांवरच संपवला होता आणि ७४ धावांची मोठी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजही संघर्ष करताना दिसले आहेत. त्यांना १०० धावांपर्यंत पोहचतानाही नाकी नऊ आले होते. पण ऍलेक्स कॅरेने त्यांना तारले.

ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेन आणि उस्मान ख्वाजा यांनी सावध सुरुवात केली होती.पण, पुन्हा एकदा कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेसाठी संकटमोचक ठरला. त्याने ११ व्या षटकात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांना बाद केलं. ख्वाजाने २३ चेंडूत ६ धावा केल्या, तर ग्रीन शून्यावर बाद झाला.

त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण १८ व्या षटकात मार्नसला मार्को यान्सिनने काईल वेरियनच्या हातून झेलबाद केले. मार्नसने ६४ चेंडूत २२ धावा केल्या. पुढच्याच षटकात स्टीव्ह स्मिथला २५ चेंडूत १३ धावा केलेल्या असताना लुंगी एनगिडीने पायचीत केले.

पहिल्या डावात अर्धशतक केलेला ब्यु वेबस्टरही २३ व्या षटकात ९ धावांवर पायचीत झाला. पुढच्या दोन षटकात ट्रॅव्हिस हेड आणि पॅट कमिन्स यांचा अडथळाही दूर झाला. हेडला विआन मुल्डरने कमालीचा चेंडू टाकत ९ धावांवर त्रिफळाचीत केले. कमिन्सला लुंगी एनगिडीने ६ धावांवर पायचित केले.

पण नंतर मिचेल स्टार्कने कॅरेची भक्कम साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १०० धावा ओलांडल्या. त्यांच्यात ८ विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली.

पण अखेर ३९ व्या षटकात कॅरेला रबाडाने ४३ धावांवर पायचीत केले. नंतर दुसरा दिवस संपेपर्यंत मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांनी विकेट जाऊ दिली नाही. ऑस्ट्रेलियाने दिवस संपला, तेव्हा ४० षटकात ८ बाद १४४ धावा केल्या आहेत. पहिल्या डावातील ७४ धावांच्या आघाडीमुळे त्यांच्याकडे आता २१८ धावांची मोठी आघाडी आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात दुसरा संपेपर्यंत कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन आणि विआन मुल्डर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथ (६६) आणि ब्यु वेबस्टरच्या (७२) अर्धशतकांच्या जोरावर ५६.४ षटकात सर्वबाद २१२ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने ५ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डावही १३८ धावांवर उरकला. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड बेडिंगघमने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. कर्णधार तेंबा बाऊमाने ३६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेतल्या.

कागिसो रबाडाचा विक्रम

कागिसो रबाडाने या सामन्यात खेळताना मोठा विक्रम केला आहे. तो आता दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा पाचव्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने जॅक कॅलिसला मागे टाकले आहे. कागिसो रबाडाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९९ डावात ५७४ विकेट्स झाल्या आहेत. जॅक कॅलिसने ५६८ डावात ५७२ विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
  • ८२३ विकेट्स - शॉन पोलॉक (५०४ डाव)

  • ६९७ विकेट्स - डेल स्टेन (३४० डाव)

  • ६६१ विकेट्स - मखाला एनटिनी (३७० डाव)

  • ६०२ विकेट्स - ऍलन डोनल्ड (२९१ डाव)

  • ५७४ विकेट्स - कागिसो रबाडा (२९९ डाव)

  • ५७२ विकेट्स - जॅक कॅलिस (५६८ डाव)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.