छत्रपती संभाजीनगर - शहराच्या पाणी पुरवठ्यावरील संकटांची मालिका कायम आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतानाच शुक्रवारी (ता. १३) पहाटे ४.२५ वाजता फारोळा येथील पंपगृहात एका उंदरामुळे स्पार्क होऊन १२०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचा पाणी पुरवठा बंद झाला.
धावपळ करून महापालिकेने दुरुस्तीचे काम पूर्ण केले, पण तब्बल नऊ तास शहराचे पाणी बंद होते. त्यामुळे शुक्रवार व शनिवारी (ता. १४) काही भागात उशिराने पाणी मिळण्याची शक्यता आहे.
शहराचा पाणी पुरवठा मार्चपासून वारंवार विस्कळीत होत आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी पाणी पुरवठ्यावरील संकट संपलेले नाही. काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होऊन शहराचा पाणी पुरवठा बंद होत आहे.
असे असताना शुक्रवारी पहाटे ४.२५ वाजता फारोळा येथील पंपगृहाला वीज पुरवठा करणाऱ्या इनकमर दोनमध्ये स्पार्क झाले. त्यानंतर १०० एमएलडी क्षमतेच्या योजनेचे पंप बंद पडले. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, याठिकाणी मोठा उंदीर घसल्याचे निदर्शनास आले.
दुरुस्तीसाठी महापालिकेकडे तज्ञ कर्मचारी नसल्याने पाणी पुरवठा विभाग (यांत्रिकी) प्रभारी कार्यकारी अभियंता दत्तात्रेय गायकवाड यांनी खासगी कर्मचाऱ्याचा शोध घेतला व त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. अडकलेला उंदीर काढून चाचणी घेण्यात आली पण वीज उपकेंद्रातील वीज पुरवठा स्टॅंड होत नव्हता. त्यामुळे उपकेंद्रात पाहणी करण्यात आली.
हा बिघाड काढता काढता दुपार झाली. त्यानंतर १२.४० वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला. दरम्यानच्या काळात तब्बल ९ तास १२०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन बंद होती. त्यामुळे सिडको-हडकोसह विविध भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. दुपारनंतर शहरात पाणी आले मात्र आज ज्या भागातील टप्पे पूर्ण होऊ शकले नाहीत, तिथे शनिवारी पाणी दिले जाणार आहे.