पुणे : पुणे स्टेशन जवळील क्वीन्स गार्डन परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता वीज कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह एक ते दीड तास पाऊस बरसला. दरम्यान, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन जवळील क्वीन्स गार्डन परिसरात वीज कोसळण्याची घटना घडली. वीज कडाडताना मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली.
जुने शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) व विभागीय आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरातच वीज कोसळली. याबाबत अग्निशामक दलाच्या लोहियानगर येथील नियंत्रण कक्षात नागरिकांनी खबर दिली. त्यानंतर नायडू अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोचले.
त्याचवेळी महावितरण कंपनीचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोचले. वीज कोसळलेल्या ठिकाणी सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.