फुलंब्री : तहसील कार्यालयात कर्मचारी उशिरा येण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गोपनीय दौरा करीत फुलंब्री तहसील कार्यालयाच्या पायरीवर खुर्ची टाकून हातात हजेरी मस्टर घेऊन स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये तहसील कार्यालयातील १६ पैकी तीन तर पंचायत समिती कार्यालयातील ४५ पैकी दहा कर्मचारी हजर होते.
यावेळी गैरहजर कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कपात करून त्याची नोंद सर्विस बुक मध्ये केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी (ता.१३) माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे आता उशिरा येणाऱ्या किंवा रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची धांदल उडणार असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये सर्वच तहसील कार्यालयात कर्मचारी उशिरा येण्याचे प्रकार सातत्याने होत आहे. अशा तक्रारी देखील जिल्हाधिकाऱ्याकडे केली जाते. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्टिंग ऑपरेशन करीत गोपनीय दौरा केला. फुलंब्री येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आले.
त्यांनी आपले वाहन इमारतीच्या पाठीमागे लावण्याचा सूचना दिल्या. त्यानंतर एक खुर्ची घेऊन स्वतः हजेरी रजिस्टर सोबत घेत चक्क तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पायरीवरच ठाण मांडले. साडेनऊ वाजेपासून जिल्हाधिकारी साध्या वेशात येऊन बसलेले होते. बसल्यानंतर वीस मिनिट कुणीही आले नव्हते.
त्यानंतर दहा वाजेच्या दरम्यान दोन कर्मचारी आणि एक नायब तहसीलदार संजीव राऊत हे हजर झाले. तर उर्वरित तेरा कर्मचाऱ्यांची गैरहजरीची नोंद जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हजेरी रजिस्टर मध्ये केली. दहा नंतर आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला उशिरा येण्याचे कारणे विचारली मात्र कुणालाही काही सांगता आले नाही.