एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला, आतापर्यंत काय माहिती आली समोर?
BBC Marathi June 14, 2025 03:45 AM
BBC

अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाने या माहितीला दुजोरा दिला आहे.

एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते.

भारतीय वंशाचे एक ब्रिटीश प्रवासी या दुर्घटनेतून बचावले आहेत. विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव असून ते विमानातील 11A क्रमांकाच्या सीटवर होते, अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

हे विमान एअर इंडियाचे Flight AI171 होते. उड्डाणानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 242 प्रवाशांसह हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते.

दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला

रॉयटर्स आणि AFP या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाती विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दोन्ही संस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

विमानामध्ये सहसा दोन ब्लॅक बॉक्स असतात. हे लहान पण अत्यंत मजबूत इलेक्ट्रॉनिक डेटा रेकॉर्डर असतात. त्यापैकी एक कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो, त्यामुळे तपासकर्त्यांना पायलट काय बोलत होते आणि काही असामान्य आवाज झाले होते का हे ऐकता येते.

दुसरा ब्लॅक बॉक्स उंची आणि वेग यांसारखा फ्लाइट डेटा रेकॉर्ड करतो.

बीबीसी ही माहिती स्वतंत्रपणे पडताळून पाहत आहे. अधिक तपशील मिळाल्यानंतर पुढील अपडेट दिले जातील.

दरम्यान, भारताच्या विमान वाहतूक नियामक संस्था DGCA ने एअर इंडियाच्या बोईंग 787-8 आणि 787-9 विमानांच्या अतिरिक्त सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत.

मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई होरपळली

या विमान अपघातातील जखमींवर सध्या अहमदाबादमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इथं अनेक हृदयद्रावक गोष्टी पाहायला मिळत आहेत.

अहमदाबादच्या रुग्णालयात बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये पोहोचल्या, तेव्हा तिथं आकाश नावाच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळली.

एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले, तिथेच आकाश राहायचा आणि कॅफेटेरियामध्ये काम करायचा.

अपघातानंतर विमानाने अचानक पेट घेतला. त्यात आकाश भाजला. ते पाहून त्याची आई सीताबेन आगीकडे धावली. पण त्यांना आकाशला वाचवण्यात यश मिळालं नाही.

BBC सीताबेन आणि आकाश

त्या आगीत सीताबेन मोठ्या प्रमाणात भाजल्या. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीबीसी प्रतिनिधी आकाशचा मोठा भाऊ कल्पेशला भेटले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. धाकटा भाऊ आणि आईचा आईचा फोटो पाहून तो सारखा रडत होता.

विमान अपघात झाला, तेव्हा आकाशचे वडील जवळच होते. विमान कोसळलं, तेव्हा मोठा आवाज झाला आणि धुरांचे लोट उसळले, असं त्यांनी सांगितलं.

वडील अपघाताच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्नीला आधीच रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांचा मुलगा वाचला नाही, हे त्यांना उशिरा कळलं.

बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

फुकेतहून नवी दिल्लीकडे येणाऱी एअर इंडियाची फ्लाइट AI379 परत फुकेत विमानतळावर वळविण्यात आली आहे. फ्लाइट AI379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर हे विमान माघारी वळवण्यात आलं.

फुकेत इंटरनॅशनल विमानतळ प्रशासनाने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला माहिती दिली की त्यांना विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे.

Getty Images

यानंतर विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची विनंती करण्यात आली.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 156 प्रवाशांसह हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजता उड्डाण केले होते आणि आता ते सुरक्षितरित्या उतरले आहे.

विमान कोसळलेल्या वसतीगृहातील मेडिकलच्या 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू Reuters अपघातात आपल्या कुटुंबीयांना गमावलेल्या व्यक्तील शोक अनावर झाला. पोस्ट मार्टम रुमबाहेरच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

अहमदाबादच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर गुरुवारी (12 जून) एअर इंडियाचे एक विमान कोसळल्यामुळे एमबीबीएसच्या पाच विद्यार्थ्यांचा, एका पीजी रेसिडेंट डॉक्टरचा आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर 60 पेक्षा जास्त वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत.

अखिल भारतीय वैद्यकीय संघटनेनं (FAIMA) ने ही माहिती दिली आहे.

BBC कोसळलेल्या विमानाचे अवशेष

FAIMA चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिव्यांश सिंग यांनी सांगितले की, अपघातस्थळी शोधमोहीम अजूनही सुरू आहे आणि ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे.

त्यांनी म्हटलं की, "जे मृतदेह सापडले आहेत, ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहेत."

Getty Images विमान अपघातस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था आहे.

डॉ. सिंग यांनी सांगितले की, "या अपघातात बी.जे. मेडिकल कॉलेजमधील किमान पाच विद्यार्थी, एक पीजी रेसिडेंट डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत."

त्यांनी पुढे म्हटलं की, "आतापर्यंत मला मिळालेल्या माहितीनुसार विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते बी.जे. मेडिकल कॉलेजच्या पुरुष वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. ती दुपारची जेवणाची वेळ होती, त्यामुळे बहुतेक विद्यार्थी आणि रेसिडेंट डॉक्टर तिथे उपस्थित होते."

अपघातानंतर अनेक तास उलटूनही मृतांची अधिकृत संख्या जाहीर करण्यात आलेली नाही.

'केवळ एकच व्यक्ती वाचणं दुर्मिळ', तज्ज्ञ काय म्हणतात?

ब्रिटनचे विश्वास कुमार रमेश हे अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातातून बचावलेले एकमेव व्यक्ती आहेत.

"केवळ एकच माणूस वाचणं फारच दुर्मिळ आहे," क्रॅनफिल्ड विद्यापीठातील 'एव्हिएशन अॅन्ड द एन्व्हायर्नमेंट' विभागातील सहयोगी प्राध्यापक गाय ग्रॅटन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

BBC

त्यांनी म्हटलं, "आधुनिक प्रवासी विमाने अशी बनवलेली असतात की अपघात झाला तरी शक्य तितक्या अधिक लोकांचे प्राण वाचावेत."

"बहुतेक वेळा अशा अपघातांमध्ये खूप लोक वाचतात किंवा जर अपघात भीषण असेल, तर कोणीच वाचत नाही. पण फक्त एकच माणूस वाचणे फारच आश्चर्यकारक आहे."

ग्रॅटन यांनी विश्वास कसे बचावले असावेत याचा अंदाज व्यक्त करताना म्हटलं की, रमेश यांची 11A सीट अपघातात विमानातून दूर फेकली गेली असावी आणि ते त्या सीटवर बसलेले असावेत."

"ते खूप नशीबवान होते."

अपघातस्थळी फॉरेन्सिकची टीम PTI

अपघातस्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ दाखल झाले आहेत आणि अपघाताशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

आज (13 जून) विमानतळावर आणि तिकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदाबादला भेट

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादला भेट दिली आहे. आज (13 जून) सकाळी इथे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून अपघात स्थळाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी जवळपास 20 मिनिटं अपघात स्थळाला भेट दिली आणि त्यानंतर ते तिथून निघाले.

त्यांनी कोणतेही विधान केलं नाही आणि बहुतांश प्रसारमाध्यमांना या भेटीवेळी दूर ठेवण्यात आले होते.

PTI पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील हॉस्पिटलला भेट देताना

अपघात स्थळाला भेट दिल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलकडे गेले. तिथे ते अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला भेटतील.

हे सध्या अहमदाबादमध्येच आहेत. त्यांनी मोदींच्या भेटीबद्दल माहिती देताना म्हटलं, "अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या खूप घडामोडी सुरू आहेत. पंतप्रधान तिथे पोहोचले होते. हे विमान विमानतळाजवळील डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. त्यावेळी जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी ते इथं आले आहेत."

"आपल्याला इतकं माहीत आहे की, विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे, पण इमारतीवर विमान आदळल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्यांची किंवा जखमींची अधिकृत संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही."

माध्यमांना रुग्णालयापासून काही मीटर अंतरावरच थांबवण्यात आले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं अरुणोदय मुखर्जींनी सांगितलं.

विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

गुरुवारी (12 जून) रात्री भारताने एअर इंडियाच्या अपघाताची अधिकृत चौकशी सुरू करण्याची घोषणा केली.

एअर इंडियाच्या अपघाताची अधिकृत चौकशी सुरू करणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किन्जारापु यांनी सांगितले की, भारताच्या विमान अपघात चौकशी ब्युरोने (Aircraft Accident Investigation Bureau) आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार चौकशी सुरू केली आहे.

Getty Images कोसळलेल्या विमानाचे अवशेष

किन्जारापु यांनी एक्सवर माहिती देताना म्हटलं की, सरकार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करत आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. ही समिती संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास करेल."

"ही समिती विमानवाहतुकीतील सुरक्षेची पातळी उंचावण्यावर आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यावर काम करेल," असंही त्यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे (FAA) क्रिस रोशेलो यांनी म्हटलं होतं की, एक तज्ज्ञांची टीम भारतात येत आहे, जी या अपघाताच्या चौकशी करण्यात मदत करणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनीही सांगितले की, त्यांची एक टीम गुजरातमध्ये पाठवण्यात आली आहे आणि ती या चौकशीत सहभागी होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.