भारताचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय कसोटी संघाला २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी खेळाडू जोरदार तयारीही करत आहेत.
अशात मंगळवारी हे स्पष्ट झाले की सध्या भारत अ संघात असलेला ऋतुराज गायकवाडने काऊंटी क्लब यॉर्कशायरसोबत करार केला आहे. त्यामुळे आता तो पुढच्या महिन्यात या संघाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका सुरू असतानाच दुसरीकडे इंग्लंडमध्येच ऋतुराज काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
आता ऋतुराज पाठोपाठ २२ वर्षीय देखील इंग्लंडमध्ये खेळताना दिसू शकतो. त्याच्यासोबत करार करण्यास काऊंटी क्लब हॅम्पशायर उत्सुक आहे. याबाबत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने पुष्टी केली आहे.
त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे की तिलकला हॅम्पशायरकडून संपर्क करण्यात आला आहे. तिलक हैदराबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
हैदराबाद क्रिकेटने म्हटले आहे की 'हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला हे सांगण्यात आनंद होत आहे की हैदराबादचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एन. ठाकूर तिलक वर्मा याच्याशी लीग खेळण्यासाठी हॅम्पशायर काऊंटी संघाकडून संपर्क साधण्यात आला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन त्याच्या हॅम्पशायर काऊंटी सोबतच्या कार्यकाळासाठी त्याला शुभेच्छा देत आहे.'
तिलक वर्मा नुकताच आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता. त्याला यंदा फारशी खास कामगिरी करता आली नाही. त्याने १६ सामन्यांत २ अर्धशतकांसह ३४३ धावा केल्या.
तिलकने भारतासाठी ४ वनडे आणि २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत एका अर्धशतकासह ६८ धावा केल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ७४९ धावा केल्या आहेत.
तिलकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८ सामन्यांत ५ शतके आणि ४ अर्धशतकांसह १२०४ धावा केल्या आहेत, तर ३६ लिस्ट ए सामन्यात ५ शतके आणि ८ अर्धशतकांसह १४९४ धावा केल्या आहेत. त्याने ११९ टी२० सामनेही आत्तापर्यंत खेळले असून ४ शतके आणि २१ अर्धशतकांसह त्याने ३६५८ धावा केल्या आहेत.