Los Angeles Violence – रस्त्यावर जाळपोळ, अ‍ॅपलचे शोरूम लुटले…; लॉस एंजेलिसमधील परिस्थिती आणखी चिघळली, कर्फ्यू लागू
Marathi June 12, 2025 03:24 AM

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. अवैध स्थलांतरीतांविरोधात करण्यात येणारी कारवाई आणि अटकेविरोधात जनतेची निदर्शने सुरूच आहेत. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत असून अमेरिकेत काल रात्रीपासून हिंसाचार उफाळून आलाय. शांततेत सुरू असलेल्या विरोधाला आता हिंसक वळण लागलेय. निदर्शकांनी अ‍ॅपलच्या शोरूममध्ये लुटमार केली आहे. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती अधिकाधिक बिकट होताना दिसत आहे.

अमेरिकेतील हा हिंसाचार लक्षात घेता महापौर कैरेन बास यांनी लॉस एंजेलिसच्या अनेक भागात कर्फ्यू लागू केला आहे. रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असेल. हा कर्फ्यू जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत पुढील काही दिवस लागू राहू शकतो. कर्फ्यू परिसरात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांना कर्फ्यू लागू होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सोमवारी रात्री दरोडेखोरांनी तेथील एका अ‍ॅपल स्टोअरमध्ये दरोडा टाकला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक मास्क घातलेले लोक अ‍ॅपल स्टोअरमध्ये घुसून गॅजेट्स लुटताना दिसत आहेत. दरम्यान पोलीस येताच त्यांनी तेथून पळ काढला आहे.

लॉस एंजेलिसच्या महापौर कैरेन बास यांनी पोस्टमधून हिंसाचाराचा निषेध केला. “मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की, शहराच्या मध्यभागी तोडफोड करणाऱ्या किंवा दुकानांमध्ये लुटमार करणाऱ्या कोणालाही आपल्या स्थलांतरित समुदायांची पर्वा नाही. त्यामुळे तोडफोड करणाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये आणखी 2000 नॅशनल गार्ड्स आणि 700 मरीन तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये 2000 नॅशनल गार्ड तैनात करण्याची घोषणा केली होती. याला राज्यपालांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान, ट्रम्प यांनी तेथे आणखी 2 हजार सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.