Shreyas Iyer एक रनवर आऊट होऊनही का हसला? कॅच घेणाऱ्या कर्णधारानं नेमकं काय केलं, एकदा Video पाहाच
esakal June 12, 2025 04:45 AM

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरतोय. त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना गाठला होता. पण त्यांना अंतिम सामन्यात केवळ ६ धावांनी पराभवाचा धक्का बसला होता.

यानंतर आता त्याच्याच नेतृत्वाच मुंबई टी२० लीग स्पर्धेत सोबो मुंबई फॅलकन्स संघानेही अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दरम्यान, या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात विकेटची बरीच चर्चा झाली.

झाले असे की उपांत्य फेरीत सोबो मुंबई फॅलकन्सचा सामना नमो बँड्रा ब्लास्टर्स संघाविरुद्ध होत होता. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात बँड्रा ब्लास्टर्सने सोबो मुंबईसमोर विजयासाठी १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

या लक्ष्याचा पाठलाग करताना सोबो मुंबईकडून अंगक्रिश रघुवंशी आणि इशान मुलचंदानी यांनी चांगली सुरुवात केली होती. पण अंगक्रिश १४ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. त्यानंतर अमोघ भटकलही १० धावांवर माघारी परतला. त्यामुळे सागर छाब्रिया गोलंदाजी करत असलेल्या ८ व्या षटकात श्रेयस अय्यर फलंदाजीला आला होता.

श्रेयसने पहिल्या दोन चेंडूत १ धाव केली. त्यानंतर ८ व्याच षटकाचा ५ वा चेंडूवर श्रेयसने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागाला लागून उंच उडाला. त्यावेळी कर्णधार आकाश आनंदने त्याला अफलातून झेल घेतला.

झेल घेतल्यानंतर मात्र त्याने आक्रमकपणे सेलीब्रेशन केलं. त्याने ओरडत मैदानात पळत आक्रमक सेलिब्रेशन केले. त्याचं हे सेलिब्रेशन पाहून १ धावेवर बाद होऊनही श्रेयस अय्यरला त्याचं हसू रोखता आलं नाही. त्याच्या या रिऍक्शनचा सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात हर्ष अघाव देखील ८ धावांवर बाद झाला. पण इशान मुलचंदानी आणि आकाश पारकर यांनी चांगला खेळ केला. संघाला विजयासाठी १ धावेची गरज असताना आकाश पारकर २० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा करून बाद झाला.

उर्वरित एक धाव श्रेयांश रायने केली. इशा मुलचंदानी ३४ चेंडूत २ चौकारआणि ३ षटकारांसह ५२ धावा करून नाबाद राहिला. मुंबई फॅलकन्सने १४.४ षटकात ५ विकेट्स गमावत १३१ धावांचं लक्ष्य पूर्ण केलं.

बँड्रा ब्लास्टर्सकडून सागर छाब्रियाने २ विकेट्स घेतल्या. कार्श कोठारी, ध्रुमिल मटकर आणि विक्रांत औटी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी बँड्रा ब्लास्टर्सला सोबो मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला बोलावले होते. बँड्रा ब्लास्टर्सने २० षटकात सर्वबाद १३० धावा केल्या. बँड्राकडून ध्रुमिल मटकरने ३४ धावा केल्या, तर कर्णधार आकाश आनंदने ३१ धावा केल्या, तर सागर छाब्रियाने २३ धावा केल्या.

सोबो मुंबईकडून गोलंदाजी करताना आकाश पारकरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. सिद्धार्थ राऊतने २ विकेट्स घेतल्या, तर यश डिचोलकर आणि विनायक भोईर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.