नांदेड : नांदेडहून थेट गोवा अशी विमानसेवा जुलै महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. फ्लाय-९१ या नव्या विमान कंपनीने याची घोषणा केली असून, नांदेड विमानतळावरून गोवा आणि बंगळुरू या शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या नांदेडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
नांदेड-गोवा-बंगळुरू या मार्गावरील विमानसेवेच्या चाचपणीसाठी फ्लाय ९१ या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नांदेड येथे काही दिवसांपूर्वीच भेट देऊन विमानतळाची पाहणी केली होती. पाहणीनंतर या कंपनीकडून नांदेड-गोवा-बंगळुरू या विमानसेवेची घोषणा करण्यात आली आहे.
फ्लाय-९१ ही कमी अंतराच्या प्रवासासाठी खास करून प्रादेशिक स्तरावर सेवा देणारी कंपनी असून, ती उडाण (उडे देश का आम नागरिक) योजनेंतर्गत ही सेवा देणार आहे. नांदेड-गोवा या मार्गासाठी कंपनीने प्राथमिक पातळीवर तयारी पूर्ण केली असून, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
विमानतळ प्राधिकरणाकडून अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या सेवेला अंतिम स्वरूप यायला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर तिकीट दर, वेळापत्रक आणि बुकिंगबाबतची माहिती जाहीर केली जाईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
सध्या नांदेड येथून स्टार एअर या कंपनीकडून हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, अहमदाबाद व पुणे या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. ही विमानसेवा दोन दिवस तीन फ्लाइट, पाच दिवस चार फ्लाइट; तर रविवार आणि सोमवारी पाच फ्लाइट अशी सुरू आहे.
फ्लाय-९१ या विमान कंपनीने नांदेड-बंगळुरू व नांदेड-गोवा विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, मी या घोषणेचे स्वागत करतो. या विमान कंपनीचा एक चमू नुकताच नांदेड येथील श्रीगुरू गोबिंदसिंघजी विमानतळाला भेट देऊन गेला. या दोन्ही विमानसेवांचा आरंभ येत्या जुलैमध्ये अपेक्षित आहे.
- अशोक चव्हाण, खासदार