पुणे ता. १३ ः दुर्गम भागातील ग्राहकांना बॅंकिंग सेवा प्रदान करण्यासाठी सासवड येथील संत सोपानकाका सहकारी बँकेतर्फे ‘बँक ऑन व्हील्स’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष संजय जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली ‘बँकिंग व्हॅन’ ही राज्यातील दुर्गम भागात जाऊन ग्राहकांना बॅंकिंग सेवा प्रदान करणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन २३ जूनला सकाळी ११ वाजता सासवड येथे होईल. याप्रसंगी सासवड येथील संत सोपानकाका महाराज संस्थान देवस्थानचे मालक ॲड. गोपाळ गोसावी, अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त ॲड. त्रिगुण गोसावी, आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान देवस्थानचे अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त योगिराज निरंजननाथ आदी उपस्थित असतील, असे जगताप यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष प्रकाश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे आदी उपस्थित होते.