स्वीकारशील, मदतशील नातं
esakal June 14, 2025 01:45 PM

- सोनम म्हसवेकर आणि अजित साबळे

‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘देव माणूस - मधला अध्याय’ मालिकेतील ‘लाली’ म्हणजेच सोनम म्हसवेकर आणि तिचा खास मित्र अजित साबळे, यांची मैत्री ही त्या दोघांच्या अभिनय प्रवासाइतकीच सुंदर आणि मनमोकळी आहे. पुण्याच्या ललित कला केंद्रात सुरू झालेलं त्यांचं नातं, आज गहिऱ्या विश्वासात आणि निर्मळ आठवणीत रुजलेलं आहे.

सोनम सांगते, ‘‘अजित माझा बेस्ट फ्रेंड आहे; पण गंमत म्हणजे, मी कधीही त्याला ‘अजित’ नावानं हाक मारलेली नाही. आमची खरी मैत्री सुरू झाली कॉलेजमधल्या एका नाटकाच्या बॅकस्टेजवर. तेव्हा मस्ती, धमाल, काम यामध्ये आमचं नातं खुलत गेलं.’

ती अजितविषयी कौतुकाने म्हणते, ‘‘तो खरंच फुल पॅकेज आहे - उत्तम अभिनेता, लेखक, दिग्दर्शक... पण त्याचं सर्वांत आवडतं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ‘ह्युमर’ आणि सकारात्मक दृष्टिकोन. कितीही अवघड वेळ आली, तरी तो संयमानं मार्ग काढतो.’’

तिचं अजितबद्दल एक निरीक्षणही गमतीशीर आहे, ‘‘त्याला ‘नाही’ म्हणता येत नाही! कधी-कधी त्याच्या या गुणामुळे त्यालाच त्रास होतो; पण शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे तो कुठलीही गोष्ट धरून न ठेवता सोडून देतो आणि पुढे जातो.’’ दोघांच्या मैत्रीचे किस्सेही तितकेच रंगतदार आहेत. ती सांगत होती, ‘‘एकदा मस्ती करताना नकळत अजितच्या हाताला माझं नख लागलं होतं, आणि तेही इतकं वाईट पद्धतीने की अक्षरशः त्याच्या हातातून रक्त आलं होतं. आजही त्याची खूण त्याच्या हातावर आहे – मैत्रीची खूणच जणू!’’ सोनम अजितच्या गावीही गेली आहे आणि तिथं त्याच्या आईने बनवलेली दालबाटी आजही तिच्या आठवणीत आहे.

सोनम म्हणते, ‘‘अजितसोबत असताना मी कोणताही फिल्टर न वापरता जशी आहे तशी वागू शकते. हेच खरं नातं. समोरच्याने आपल्याला तसं स्वीकारणं, हेच मैत्रीचं खरं सौंदर्य आहे.’’

अजितही सोनमविषयी बोलताना म्हणतो, ‘‘तिला पाहिलं तेव्हा वाटलं होतं, ती खूप शिष्ट असेल; पण ओळख होईपर्यंतच तसं वाटलं. मग मात्र ती माझी खास मैत्रीण झाली. सोनमचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं एक्सप्रेसिव्ह असणं. तिला जे वाटतं, ते स्पष्टपणे बोलते, वागते. तिच्या बोलण्यातून आणि कृतीतून भावनांचा तो ओघ नेहमी जाणवतो.’’ अजितला सोनमचं सकारात्मक वातावरण तयार करणं, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं, हे सगळं फार भावतं.

तो पुढे म्हणतो, ‘‘ती कितीही कठीण टप्प्यावर असली, तरीही तिच्या चेहऱ्यावर त्याचा थांगपत्ता लागत नाही. हे तिचं मानसिक बळ मोठं आहे. आज ती ‘देवमाणूस’मध्ये अशी भूमिका करताना पाहून मला खूप आनंद झाला. तिच्या अभिनयावर मला पूर्ण विश्वास आहे.’’

सोनम आणि अजित यांच्या या नात्यात प्रेम, विश्वास, मस्ती, आणि मोकळेपणा सगळं भरलेलं आहे. एकमेकांना समजून घेणं, सहवासात वाढत जाणं आणि ‘जसे आहोत तसं’ स्वीकारणं - हाच त्यांच्या मैत्रीचा खरा रेशीमगाठींनी विणलेला अर्थ आहे.

(शब्दांकन : मयूरी गावडे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.