Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर कायम; वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण
esakal June 14, 2025 07:45 PM

पुणे : शहरात शुक्रवारी (ता. १३) पावसाने दमदार हजेरी लावत पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यवर्ती भागांसह उपनगरांत जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी, वाहतूक कोंडी, झाडपडी, अपघात आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांनी नागरिक हैराण झाले.

गुरुवारपासून शहरात पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी देखील पावसाचा जोर कायम राहिला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते, तर दुपारी कडक ऊन पडले होते. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास कोथरूड, डेक्कन, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, बाणेर, औंध, बालेवाडी, स्वारगेट, धनकवडी, कात्रज, हडपसर, कोंढवा, बावधन, पाषाण, बिबवेवाडी, लोहगाव, विश्रांतवाडी, म्हाळुंगे, सूस रस्ता, खडकवासला, उंड्री, खराडी आदी परिसरांत मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त होता, तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

उपनगरातील स्थिती...
  • हडपसर, महंमदवाडी व मांजरी परिसर जलमय

  • पुणे-सोलापूर महामार्गासह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला.

  • हांडेवाडी परिसरात पाणी साचून मोठी वाहतूक कोंडी

  • मुंढवा-खराडी परिसरातील रस्त्यावर पाणी साचले

  • नगर रस्त्यावरील रामवाडी, खराडी बायपास, मुंढवा, महात्मा फुले चौकापर्यंत वाहतूक कोंडी

  • खराडीतील अनेक सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरले

मध्य महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार

पुणे : राज्यात दोन ते तीन दिवसांपासून विविध भागांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. सिंधुदुर्गमधील देवगड येथील आंबा फळ संशोधन केंद्र येथे आज सकाळी आठ वाजेपर्यंत ३०२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील ६४ मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. मे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

  • मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रायगड, रत्नागिरी.

  • जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.