एअर इंडिया विमान अपघातात डॉक्टरसह पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू, यूकेतील सहकाऱ्यांनी सांगितल्या 'या' आठवणी
BBC Marathi June 14, 2025 08:45 PM
Supplied डर्बी हिंदू मंदिरानं म्हटलं आहे की, डॉ. प्रतीक जोशी, त्यांची पत्नी आणि तीन अपत्यं यांचा विमान अपघातात मृत्यू झाला

एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाचा देखील समावेश आहे.

गुरुवारी (12 जून) बोईंग 787 विमानाला अपघात झाल्यानंतर विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान अहमदाबादहून गॅटविक, लंडनला जात होतं. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेंकदातच हे विमान कोसळलं होतं.

या विमानात डॉ. प्रतीक जोशी, त्यांची पत्नी आणि तीन अपत्यं होती. डॉ. जोशी रॉयल डर्बी हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्ट होते, अशी माहिती पेअर ट्रीमधील डर्बी हिंदू मंदिरानं दिली आहे.

मंदिराच्या प्रवक्त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यात म्हटलं आहे की, या "शोकग्रस्त कुटुंबाला हे प्रचंड दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी", यासाठी ते प्रार्थना करत आहेत.

या विमानात 242 जण होते. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळलं होतं.

विमानातील प्रवाशांमध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनडाचा नागरिक होता.

डॉ. जोशी यांच्या निधनाच्या बातमीनं हादरलेला शेजारी

42 वर्षांचे नील रायन पूर्वी डॉ. जोशी यांच्या कुटुंबाचे शेजारी होते. ते म्हणाले की, डॉ. जोशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मृत्यू बातमी "अतिशय हादरवून टाकणारी" होती. ते "सर्वात छान कुटुंब होतं", असं ते म्हणाले.

नील म्हणाले, "डॉ. जोशी यांचं कुटुंब खूपच विनम्र, दयाळू आणि प्रामाणिक होतं. त्यांच्या मृत्यूची बातमी ह्रदय पिळवटून टाकणारी आहे."

BBC विमान अपघाताच्या बातमीनं डॉ. प्रतीक जोशी यांचे आधीचे शेजारी "अतिशय दु:खी" झाले

नील रायन यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या शेजारून हे कुटुंब जवळच दुसरीकडे राहण्यास गेलं आणि तिथे ते काही वर्षे राहिले. त्यानंतर डॉ. जोशी यांची पत्नी आणि मुलं भारतात परत आली आणि डॉ. जोशीच तिथे होते.

ते पुढे म्हणाले की, ज्यावेळेस डॉ. जोशी यांचं कुटुंब निघून गेलं, तेव्हा ते भेटायला आले. आम्ही नेहमीच एकमेकांशी बोलायचो. येताना ते जिनची बाटली, केक, चहा अशा बऱ्याच गोष्टी घेऊन आले होते.

"ती खूपच छान माणसं होती."

'आयुष्यातील पुढचा टप्पा'

मारिओ दिमित्रिओ डोनाडिओ हे दुसऱ्या डॉक्टरची तात्पुरती जागा घेणारे रेडिओलॉजिस्ट होते. ते डॉ. जोशी यांच्यासोबत काम करत होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा त्यांना ही बातमी कळाली तेव्हा त्यांचं "मन झाकोळून गेलं आणि त्यांना प्रचंड दु:ख झालं".

डॉ. जोशी त्यांचे सहकारी होते आणि ते दोघे एकाच फ्लॅटमध्ये राहायचे. मारिओ यांनी डॉ. जोशी हे अतिशय उत्तम डॉक्टर होते असं सांगितलं. ते पुढे म्हणाले की मे महिन्यात जेव्हा ते दोघे इतर रेडिओलॉजिस्ट्सबरोबर जेवायला बाहेर गेले होते, तेव्हा डॉ. जोशी" खूपच आनंदी" होते.

Derby Hindu Temple डॉ. जोशी यांच्या आधीच्या शेजाऱ्यानं त्यांचं कुटुंब "खरोखरंच दयाळू होतं" असं म्हटलं

डॉ. डोनाडिओ म्हणाले की, डॉ. जोशी यांनी काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांना सांगितलं की ते त्यांच्या कुटुंबाला युकेमध्ये पुन्हा आणण्याचा विचार करत आहेत आणि "आयुष्याचा पुढचा टप्पा" सुरू करत आहेत, तेव्हा ते "खरोखरंच खूश" होते.

"ते नेहमीच उत्साही, आनंदी असायचे. ते एक आनंदी, उत्साही व्यक्तिमत्वं होतं. ते नेहमीच आनंदात, उत्साही आणि सकारात्मक असायचे," असं डॉ. डोनाडिओ म्हणाले.

"त्यांच्यासारखी व्यक्ती गेल्यामुळे जगाचं नुकसान झालं आहे," असं ते म्हणाले.

युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ डर्बी अँड बर्टन (यूएचडीबी) एनएचएस फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं की, डॉ. जोशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या निधनामुळे त्यांना "प्रचंड दु:ख झालं आहे."

यूएचडीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन पॉसी म्हणाले, "प्रतीक हे उत्तम डॉक्टर होते. त्यांच्यासाठी काहीच कठीण नव्हतं. मात्र त्याचबरोबर ते प्रेमळ, हसरे आणि दयाळू व्यक्ती होते. ते टीममधील सहकाऱ्यांचे अत्यंत आवडते आणि मौल्यवान सदस्य होते."

प्रेमळ सहकारी आणि निष्णात डॉक्टर

ट्रस्टनं म्हटलं आहे की, डॉ. जोशी 2021 मध्ये भारतातून डर्बीला आले होते. त्यांनी यूएचडीबीमध्ये चार वर्ष काम केलं.

डॉ. राजीव सिंह, यूएचडीबीमध्ये कन्सल्टन्ट रेडिओलॉजिस्ट आहेत. ते म्हणाले, डॉ. जोशी "अतिशय आनंदी व्यक्तिमत्वं" होतं आणि ते "अत्यंत निष्णात रेडिओलॉजिस्ट" होते.

ते पुढे म्हणाले की, ते अनेकदा त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या कामाबाहेरील त्यांच्या आवडींबद्दलच्या गोष्टी सांगून त्यांचं मनोरंजन करायचे. यात त्यांना अलीकडेच मासे आणि चिप्सची निर्माण झालेली आवड आणि पीक डिस्ट्रिक्टमध्ये पायी फिरण्यातील उत्साह याचा समावेश होता.

ते म्हणाले, "त्यांनी त्यांच्या वैद्यकीय कामाद्वारे आणि तसंच अनेकांचा सहकारी आणि मित्र म्हणून असंख्य लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला."

अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या फ्लाइट एआय171 नं गुरुवारी (12 जून) दुपारी उड्डाण केलं. मात्र विमानाच्या उड्डाणात अडचण आली आणि ते फक्त 30 सेकंदात कोसळलं.

Getty Images अहमदाबाद विमान अपघात

विमानाला उंची गाठण्यास अडचण येत असतानाच विमानातून वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे हवाई नियंत्रण कक्षाला मेडेचा कॉल दिला होता, असं भारताच्या हवाई वाहतून नियामक संस्थेनं सांगितलं आहे. मात्र त्यानंतर विमानानं कोणताही प्रतिसाद दिला नाही.

मेडे म्हणजे विमानात जेव्हा आपत्कालीन स्थिती निर्माण होते, तेव्हा मदतीसाठी हा कॉल दिला जातो.

त्यानंतर विमान मेघाणीनगर नावाच्या निवासी भागात कोसळलं.

डर्बी मंदिराच्या प्रवक्त्यानं सांगितलं, "आम्ही हे अतिशय दु:खी अंतकरणानं कळवत आहोत की, अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं जे विमान कोसळलं, त्यात डॉ. प्रतीक जोशी आणि त्यांचं कुटुंब होतं."

"डॉ. जोशी रॉयल डर्बी हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्ट होते, ते डर्बीमध्ये राहायचे. ते आमच्या मंदिराचे भक्त होते. त्यांनी मंदिराची प्रामाणिकपणे आणि मनोभावे सेवा केली."

"मृतांच्या आत्म्यांना चिरंतन शांतता लाभो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हा प्रचंड धक्का सहन करण्याची शक्ती मिळो, अशी आम्ही भगवान शिवाकडे प्रार्थना करतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.