
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात ते कॅनडातील जी-7 शिखर परिषदेत सहभागी होणार असून, सायप्रस आणि क्रोएशियामध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. मात्र देशांतर्गत संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून टीका होत असताना मोदी हे परदेश दौऱ्यांवर जात आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 15-16 जून रोजी सायप्रसला भेट देतील. जिथे ते राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्यासोबत चर्चा करतील. ही 20 वर्षांनंतर हिंदुस्थानी पंतप्रधानाची सायप्रसला पहिली भेट आहे. त्यानंतर 16-17 जून रोजी कॅनडातील कनानास्किस येथे जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. शेवटच्या टप्प्यात 18 जून रोजी क्रोएशियाला भेट देऊन पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोव्हिक आणि राष्ट्रपती झोरान मिलानोव्हिक यांच्याशी चर्चा करतील. ही हिंदुस्थानी पंतप्रधानाची क्रोएशियातील पहिलीच अधिकृत भेट असेल.