पनवेल, ता. १ (वार्ताहर) : पळस्पे येथून दुचाकीवरून करंजाडे येथे जाणाऱ्या तरुणांची दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू; तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) पहाटेच्या सुमारास घडली. या अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी मृत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अपघातातील मृत तरुणाचे नाव ऋषीकेश मनोज गावडे (३०) असे असून, जखमी झालेल्या त्याच्या मित्राचे नाव अल्पेश रामचंद्र कोल्हकर (२७) असे आहे. हे दोघेही करंजाडे येथे राहण्यास आहेत. रविवारी रात्री अल्पेश हा त्याचा मित्र ऋषीकेश याच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण केल्यानंतर दोघेही उशिरापर्यंत गप्पा मारत बसले होते. त्यानंतर ते पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गोवा महामार्गावर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. दोघेही दुचाकीवरून पळस्पे येथे गेल्यानंतर ते पुन्हा करंजाडे येथे परतत होते; मात्र याच वेळी पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसात ऋषीकेशला जेएनपीए महामार्गावरील मॅरेथॉन इमारतीजवळ करंजाडे येथे जाणारा कट निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्याची दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावर धडकली. या अपघातात ऋषीकेश आणि अल्पेश दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले.
-------------------
मृतावर निष्काळजीचा गुन्हा
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी दोघांनाही कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी ऋषीकेशला मृत घोषित केले; तर अल्पेश हा गंभीर जखमी आहे. ऋषीकेश याने निष्काळजीने भरधाव दुचाकी चालवून नेल्यामुळे अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.