भाजपने माझ्यावर उपकार केलेत, प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर रवींद्र चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
GH News July 01, 2025 11:08 PM

रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे आधी कार्याध्यक्ष होते, आता ते राज्यात भाजपचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी नेंमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले की, ‘कधीच रवी दादा आगे नाही, ना रविंद्र चव्हाण आगे बढो नाही, तर भाजप आगे बढो असं पाहिजे. माझी आज या पदावर निवड झाली, भाजपने माझ्यावर उपकार केलेत असं माझं मत आहे. माझ्याबरोबर काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना त्याची जाण आहे.’

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, माझी ओळख भारतीय जनता पार्टी आहे. एवढ्या मोठ्या पक्षाच्या मोठ्या पदावर माझी नेमणूक झाली आहे. 2002 पासून पक्षाचे काम करायला सुरुवात केली. सामान्य कुटुंबातून आलेला माणूस पक्षाचा प्रमुख होतो, भाजपची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आणि प्रभावी अशी आहे. महाराष्ट्रातील लोकांपर्यंत ती पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे.

2014 च्या आधीचा काळ आठवा आणि मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार पहा, ही माणसं दिवस रात्र पाहात नाही. सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. आपलाच कार्यकर्ता हे करु शकतो. भाजपशिवाय कोणत्याही पक्षात ही विचारधारा नाही. राष्ट्रीयत्वाचा धागा मला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. बावनकुळेंनी जे सांगितले हे आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहे. तुमच्या माझ्या परिश्रमाचीच ही वेळ आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं?

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘आरएसएस भाजपचे विचार असलेला रवींद्र चव्हाण कार्यकर्ता आहे. नगरसेवक ते प्रदेशाध्यक्ष अशी कारकिर्द त्यांची राहिलेली आहे. लोकप्रिय मंत्री म्हणून आपण काम केलं आहे. रेशन मिळत नव्हतं तेव्हा त्यांनी अन्नधान्य मिळवून दिलं आहे. आज जे काही कामं सुरु आहेत पीडब्ल्यूडीची ती चांगल्याने त्यांनी केले आहेत. भाजपचं अध्यक्षपद किती मोठं आहे, उर्जा देणारे आहे. मी पूर्णपणे यशस्वी झालो नाही मात्र चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न मी केला. सर्व कार्यकर्त्यांमुळे भाजप घराघरात पोहोचली. पार्टी म्हणजे आई आहे, माझ्या काही चुका झाल्या असतील तर माफ करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.