चेक बाउन्स प्रकरणात इतर तिघांनाही शिक्षा
वृत्तसंस्था/ मोहाली
अरुणाचल प्रदेशातील भाजप आमदारासह इतर तिघांना चेक बाउन्स प्रकरणात शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. मोहाली येथील न्यायदंडाधिकारी अभय राजन शुक्ला यांच्या न्यायालयाने अरुणाचल प्रदेशातील एका विद्यमान आमदारासह इतर तिघांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. अरुणाचल प्रदेशातील सागली येथील भाजप आमदार रायतू तेची आणि टीके इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना चेक बाउन्स प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांनाही 5.55 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तथापि, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी जामीन मंजूर केला. हे प्रकरण जीटीसी-एम-ट्रेडेस एलएलपीकडून खरेदी केलेल्या बांधकाम साहित्यासाठी जारी केलेल्या 50 लाख रुपयांच्या चेक बाउन्सशी संबंधित आहे.
चेक बाउन्स प्रकरणात कायदेशीर नोटीस असूनही आरोपींनी प्रतिसाद न दिल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी मोहाली येथील जेएमआयसी अभय राजन शुक्ला यांच्या न्यायालयाने दोषींनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करत याचिका फेटाळली. दोषींमध्ये 60 वर्षीय आमदार रायतू तेची यांचा समावेश असून ते पापुम पारे जिह्यातील सागली विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आहेत. ते 2024 च्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते.