Israel-Iran War – इराणकडून आगीत ‘तेल’; युद्धाचा भडका, इस्रायलवर हल्ला करत इमारती लक्ष्य
Marathi June 15, 2025 06:24 AM

इस्रायलने शुक्रवारी पहाटे केलेल्या हवाई हल्ल्यांना इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ला इराणने ‘ऑपरेशन प्रॉमिस’ने उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलवर 150 क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला आहे. इराणने डागलेली बहुतांश क्षेपणास्त्र आणि ड्रोन इस्रायलने पाडली, मात्र काहींनी अचूक लक्ष्यभेद केला. त्यामुळे इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. इराणने इस्रायलची सांस्कृतिक आणि व्यावसायिक राजधानी तेल अविवला लक्ष्य केले आहे. दोन्ही बाजुंनी एअरस्ट्राईक सुरू असल्याने आखाती देशात युद्धाचा भडका उडाला आहे.

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणच्या दोन लष्करी छावण्या आणि चार आण्विक केंद्रांवर जोरदार हवाई हल्ले केले. त्यात लष्करी छावण्या व आण्विक केंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. इस्रायलने तब्बल 200 लढाऊ विमानांतून लागोपाठ क्षेपणास्रे डागली आणि इराणला हादरवून सोडले. हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या सहा अणुशास्त्रज्ञ, लष्कर व हवाई दलाच्या 20 वरिष्ठ कमांडर्ससह 104 ठार, तर 376 जण जखमी झाले. या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे.

इस्रायलच्या डिफेन्स फोर्सच्या मिलिट्रि रेडियोने दिलेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र डागली आहेत. इराणकडून हवाई हल्ल्यांचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणने डागलेली काही क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केल्याने इस्रायलमधील इमारती भस्मसात झाल्या. याचे व्हिडीओही समोर आले आहेत. इराणच्या हल्ल्यामध्ये 70 अधिक नागरीक जखमी, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, इराणच्या हल्ल्यानंतर तेल अविव आणि जेरुसलेममध्ये युद्धाचे सायरन वाजू लागले आहेत. आगामी काळात दोन देशांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता गृहित धरून इस्रायलने भूमिगत रुग्णालये अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. आणीबाणीच्या परिस्थिती उद्भवल्यास जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी रुग्णालयात औषधांचा साठा केला जात आहे. तसेच नागरिकांनाही सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमेरिकेचा इशारा

दरम्यान, इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमेरिकेने इराणला स्पष्ट शब्दात इशारा दिला. अमेरिकेने दोन महिन्यांपूर्वीच इराणला अण्वस्त्र करार करण्यासाठी 60 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. इराणने 60 दिवसांचा अल्टिमेटम पाळला नाही, असा दावा करीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराणच्या युद्धात आणखी तेल ओतण्याचा प्रयत्न केला. अणुकरार केला नाही तर आणखी भयंकर हल्ले करू, असे ट्रम्प यांनी इराणला ठणकावले. आज 61 वा दिवस आहे. मी त्यांना काय करायचे ते सांगितले होते, पण ते करू शकले नाहीत. आता त्यांना आणखी एक संधी देत आहोत, असे ट्विट ट्रम्प यांनी इराणला उद्देशून केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.