या रे या रे लहान थोर
पंढरीची वारी करतात म्हणजे त्यांचे शरीर वारीमध्ये असते; परंतु मनामध्ये प्रपंचाविषयी विषयांविषयी चिंतन सुरू असते आणि बुद्धीमध्येही विचार अन्य अन्य प्रकार सुरूच असतात; परंतु वारी सफल व सुफल करावयाची असेल तर जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे व केल्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या वागण्यात व बोलण्यात सुसंगती फार कमी वेळा असते. संत हे आधी करतात आणि मग सांगतात, त्यामुळे त्यांच्या वचनानुरूप आचरणाचा प्रयत्न हाच मोक्षाचा निरतिशय आनंदाचा व भगवंताच्या आत्मत्वाने प्राप्तीचा एक प्रशस्त व सुलभ मार्ग आहे.
- चिदंमबरेश्वर महाराज साखरे, आळंदी
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवे भावे।।
जगद्गुरू तुकोबाराय आपल्या जीवनाचे सूत्र थोडक्यात सांगतात, खरेतर ‘वारी’ ही एक क्रिया आहे आणि त्या क्रियेमध्ये आपल्या उपास्य देवतेकडे वारंवार जाणे म्हणजेच वारी होय. परंतु संतांच्या जीवनाचा चरित्र म्हणून विचार केला असता संतांचे जीवन हीच एक वारी आहे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे, बोलणे म्हणजे मुखाने भगवंताच्या नामाचे वारंवार उच्चारण करणे; पाहणे म्हणजे त्याचे अनुभव-पूर्वक सातत्याने चिंतन करणे व करणे म्हणजे आपली सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे म्हणजेच कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीनही प्रकाराने भगवंताचे पूजन करणे म्हणजेच वारी होय.
थोड्या वेगळ्या प्रकाराने चिंतन करायचे तर,
आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी।
बोलीले जे ऋषी। साच भावे वर्तया।।
ही सुद्धा एक प्रकाराने वारीच होय.
आताच्या काळात जी वारी केली जाते ती संतांच्या बरोबर त्यांची पालखी घेऊन, त्यांच्या सहवासामध्ये पंढरपूरपर्यंत भजन करीत भगवंताचे नामोच्चारण करीत जाणे आणि निरतिशय सुखाची प्राप्ती करून घेणे.
नाचत जाऊ त्याच्या गावा रे।
खेळी या सुख देईल विसावा रे।।
अशा स्वरूपाने अपेक्षित आहे
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवेभावे।।
येणे सोसे मन झाले हावभरी।
परत माघारी घेत नाही।।
बंधनापासून उकलिल्या गाठी ।
देता आली मिठी सावकाश।।
तुका म्हणे देह भरीला विठ्ठले।
काम क्रोधे केले घर रिते ।।
असे म्हणतात.
एकदा का त्या भगवंताच्या चरणाचे, भगवंताच्या अलौकिक अशा सगुण साकार स्वरूपाचे विटेवर उभ्या असलेल्या या भगवंताचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा तिथून माघारी येण्याची वृत्ती निर्माण होत नाही; कारण तिथे गेल्यानंतर मन स्थिर होते. त्याच्याशी एकरूप होते. आकाराकार होते.
आता कोठे धावे मन।
तुझे चरण देखलिया।।
खरे तर मनाचे स्वरूप हे संकल्प आणि विकल्प करणे अशा स्वरूपाचे आहे; परंतु भगवंताच्या दर्शनाचा स्वाभाविक परिणाम हा मनाच्या स्थिरतेमध्ये होतो.
तुका म्हणे मग न ये वृत्तीवरी।
सुखाचे शेजारी पोहूडीन।।
मनाने भगवंताचा ध्यास घेऊन आणि भगवंताचे नाम-उच्चारण करीत पंढरीत जाईल, त्या भगवंतास पाहील, त्याची वृत्ती स्वाभाविकतेने स्थिर होते. अंतर्मुख होते. नियम असा सांगतो की, स्थिर आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचे भान होते. सामान्यतः विषय प्राप्ती झाल्यानंतर देखील स्थिर आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये आनंदाचे, आत्म्याच्या आनंदाचे भान होते. भगवतप्राप्तीने भगवंताच्या दर्शनाने आणि ते देखील त्याचा ध्यास घेऊन त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही विषयाचे कोणत्याही कारणांनी किंचित देखील स्मरण न करता भगवंताचे दर्शन होईल. त्याने स्वाभाविकच वृत्ती स्थिर आणि अंतर्मुख होईलच. तेथून पुन्हा परत यावे, अशी इच्छा देखील उत्पन्न होणार नाही हे अगदीच स्वाभाविक आहे.
संत जीवनामध्ये ज्याप्रमाणे समाजाला उपदेश करून संपूर्ण समाज ज्ञानसंपन्न ज्ञानाधिष्ठित अशा स्वरुपाचा करणे हा एक भाग आहे. त्याप्रमाणे संपूर्ण समाजाला भगवत्-भजनामध्ये रममाण करून मन, वाचा व काया म्हणजेच शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशा तीनही स्वरुपाची तपश्चर्या एकत्रितपणे करून एक प्रकारे सामूहिक तपश्चर्या किंवा अनुष्ठान करवून घेणे हेही संतांनाच शक्य आहे. सामान्यांची ही कथा नव्हे.
अन्य मार्गांचा विचार केला असता शारीरिक तपासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. मानसिक तपासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. वाचिक तपासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. तेव्हा कुठे एक एक तपश्चर्या पूर्णत्वास जाईल. परंतु वारीमध्ये असे अलौकिक सामर्थ्य आहे की, ज्यामुळे या तीनही प्रकारची तपश्चर्या एकसमयावच्छेद करून घडते व मोक्षाचा प्रशस्त मार्ग खुला होतो आणि अन्यसाधनांच्या तुलनेत हा मार्ग सोपा आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात,
तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी।
शहाणा तो धनी घेतो येथे।।
भक्ती करणे देखील फार सोपे आहे, असे नाही. परंतु अन्य साधने करताना होणारे कष्ट पाहता नामभक्ती ही अत्यंत सुलभ आहे. ज्याप्रमाणे अन्यसाधनांपेक्षा भक्ती पंथ बहु सोपा असे असले तरी त्या भक्तीमध्ये सुद्धा नवविधा भक्ती म्हणजेच नऊ प्रकारची भक्ती प्राधान्याने प्रतिपादन केलेली आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णो:स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।
आणि त्या त्या प्रकारच्या भक्तीमध्ये देखील कष्ट आहेत. अधिकाराचा विचार आहे. कोणी कोणत्या प्रकारची भक्ती करावी याचा विचार आहे. कशी करावी याचाही विचार आहे. परंतु नामभक्ती मात्र,
या रे या रे लहान थोर।
याती भलते नारी नर करावा विचार।
नलगे चिंता कोणाशी।।
अशा स्वरुपाने सर्वांना मुक्त हस्ताने मोक्षप्राप्तीचा प्रशस्त मार्ग खुला करून देणारा असा हा नाम भक्तीचा उपाय जगद्गुरू तुकोबाराय सर्वांना सांगतात.
केवळ सांगतात असे नव्हे, तर आपल्या आचरणातून त्याचे आदर्श उदाहरण आपल्यासमोर ठेवतात. कारण संत हे केवळ उपदेश करतात असे नसून, शब्दद्वारा केलेल्या उपदेशापेक्षाही आपल्या आचरणातून ते उपदेश करीत असतात.
जगद्गुरू तुकोबाराय हे पंढरीचे निष्ठावंत वारकरी आहेत.
आम्ही नामाचे धारक।
नेणो प्रकार आणिक।।
सर्व भावे एक।
विठ्ठलची प्रमाण ।।
आम्ही नामाचे धारक आहोत आणि त्या नामाप्रति जगद्गुरू तुकोबारायांची अशी निष्ठा आहे की, अन्य कोणत्याही प्रकाराला मी जाणतच नाही. एका विठ्ठलाशिवाय मला काहीही प्रमाण नाही. विठ्ठलच माझा सांगाती आहे, अशी अढळवृत्ती समाजात निर्माण करण्याचे अलौकिक सामर्थ्य तुकोबारायांच्या आचरणपूर्वक प्रतिपादन केलेल्या प्रत्येक शब्दात आहे.
सामान्य मनुष्याच्या बोलण्याचा परिणाम किंवा प्रभाव हा अत्यंत मर्यादित असतो किंवा नसतोच. कारण संतांकडे असलेल्या करुणा उपाधीमुळे व जगाच्या सुखाची अत्यंत तळमळ असल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतांच्या जीवनशक्तीमुळे त्यांच्या उपदेशाला परिणामकारकता स्वाभाविकतेनेच असते. संतांचे वाङमय हे समाजाला दिशा देणारे आहे.
बाह्य स्वरुपाने वारी करावीच पण ती खरी अंतरंग स्वरुपाने केली पाहिजे. असेच उदाहरण तुकोबाराय आपल्या वाणीने व कृतीने समाजासमोर ठेवतात.
अनेक लोक माऊली सांगतात, त्याप्रमाणे
या देहाचीया गावा ।
जया लागी आलेती पांडवा ।।
तो कार्यार्थु आघवा ।
सांडूनीया ।।
वारी करतात म्हणजे त्यांचे शरीर वारीमध्ये असते; परंतु मनामध्ये प्रपंचाविषयी विषयांविषयी चिंतन सुरू असते आणि बुद्धीमध्येही विचार अन्य अन्य प्रकार सुरूच असतात. परंतु वारी सफल व सुफल करावयाची असेल तर जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे व केल्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या वागण्यात व बोलण्यात सुसंगती फार कमी वेळा असते. संत हे आधी करतात आणि मग सांगतात. त्यामुळे त्यांच्या वचनानुरूप आचरणाचा प्रयत्न हाच मोक्षाचा निरतिशय आनंदाचा व भगवंताच्या आत्मत्वाने प्राप्तीचा एक प्रशस्त व सुलभ मार्ग आहे.
तुका म्हणे हेची नीट।
जवळी वाट वैकुंठा ।।
म्हणून आपल्याला मानवी जीवन प्राप्त झाले. आता या मानवी जीवनाचा उचित उपयोग करून भक्तिमार्गाने म्हणजेच, नामभक्तीच्या मार्गाने प्रशस्त मार्गाने सुलभ मार्गाने निश्चित फलप्राप्ती करून देणाऱ्या म्हणजेच निश्चित फलपर्यवसायी मार्गाचा प्रामाणिक अवलंब करून मोक्षप्राप्ती होणे. भगवंताची आत्मत्वाने प्राप्ती होणे. म्हणजेच,
तुका म्हणे देह भरीला विठ्ठले।
काम क्रोधे केले घर रिते ।।
अशा स्वरुपाला प्राप्त होणे हे मानवी जीवनाचे खरे फलित होय.
या मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संतांनी दाखवलेल्या म्हणजेच आचरण करून दाखवलेल्या या भक्ती मार्गामध्ये आपली प्रवृत्ती होईल. आपले प्रामाणिक आचरण होईल, तरच आपल्या जीवनाला सार्थकता आहे. तशी वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होऊन आपण ही कायिक, वाचिक, मानसिक वारी करू शकलो तर आपल्यालाही तीच अवस्था प्राप्त होईल, याबद्दल कोणताही संदेह असण्याचे कारण नाही. अशी वारी आपल्याकडून घडावी व आपल्यालाही जगद्गुरू तुकोबारायांनी प्रतिपादन केलेली अवस्था प्राप्त व्हावी ही भगवान रखुमादेवीवरू बाप विठ्ठलाच्या चरणी व सकल संतांच्या चरणी प्रार्थना!
---