नांदवली परिसरातील रस्त्याची दुरुस्ती
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेकडील नांदवली परिसरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली होती. खड्डे आणि चिखलामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक दुचाकीस्वारांचे खड्ड्यांमुळे अपघात झाले होते. तसेच नागरिकांना दळणवळणासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्याने गैरसोय होत असे. त्यामुळे रस्त्यासारख्या मूलभूत समस्या लक्षात घेत शिंदे गटाचे उत्तर भारतीय सेलचे शहरप्रमुख सीपी मिश्रा यांनी आमदार राजेश मोरे यांना पत्र लिहून रस्त्याच्या दुरुस्तीची विनंती केली होती. याची दखल घेत आमदार राजेश मोरे यांच्या पुढाकाराने खडी टाकून खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आमदार राजेश मोरे, शहरप्रमुख सिपी मिश्रा यांचे आभार मानले.