Pune Rain : पुण्यात पावसाची दमदार हजेरी; जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट'
esakal June 15, 2025 07:45 AM

पुणे - शहरात शनिवारीही पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास मध्यवर्ती भागासह उपनगरांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे मध्यवर्ती भागात शालेय साहित्याची खरेदी आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्रीं’च्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

पुढील दोन ते तीन दिवस घाट विभागात अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, शनिवारीही तो कायम होता.

सकाळपासून ढगाळ वातावरण होते, तर दुपारच्या वेळी कडक ऊन पडले. त्यामुळे उकाडा वाढला. मात्र, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती भागासह उपनगर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

शनिवारी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. कमाल तापमान ३२, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस होते. पुढील दोन दिवस कमाल तापमान स्थिर राहून त्यानंतर पुढील तीन दिवस ते वाढून ३३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

हवेच्या वरच्या स्तरातील चक्रीय स्थिती मराठवाडा आणि लगतच्या भागांवर आहे, तर येत्या दोन दिवसांत नैऋत्य मॉन्सून गुजरात, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

त्यानंतरच्या तीन दिवसांत पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांतही मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे पुण्याच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

असा आहे अंदाज

पुणे आणि परिसरात रविवारी (ता. १५) कमाल तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर सोमवारी (ता. १६) कमाल तापमानात किंचित वाढ होणार असून, कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाईल. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.