फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशात निवडणुका, युनूस आणि रहमान यांच्या लंडनमधीलभेटीत चर्चा; निवेदन जारी
Marathi June 15, 2025 09:24 AM

बांगलादेशात कमालीची राजकीय अस्थिरता असताना तेथील काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांची लंडनमध्ये भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी बांगलादेशमधील सार्वत्रीक निवडणुकीबाबत चर्चा केली. जर सर्व तयारी पूर्ण झाली तर फेब्रुवारीत 2026 मध्ये रमजान सुरू होण्याच्या आधीच्या आठवडय़ातही निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असे दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तारिक रहमान यांनी पुढील वर्षी रमजानपूर्वी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव युनूस यांच्यासमोर ठेवला होता. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांनीही एकाच वेळी निवडणुका झाल्यास फायदेशीर ठरेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, युनूस आणि तारिक रहमान यांच्या भेटीला अनेक कारणांनी महत्त्व प्राप्त झाले आहे.

16 वर्षांनंतर तारिक बांगलादेशात परतणार

खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान 16 वर्षांच्या हद्दपारीनंतर बांगलादेशात लवकरच परतणार आहे. मोहम्मद युनूस सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. अवामी लीगच्या विरोधामुळे ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी युनूसना भेटण्यास नकार दिला. सध्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा बीएनपी बांगलादेशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, कारण शेख हसीना यांच्या अवामी लीगवर निवडणूक लढवण्यास बंदी आहे.

देशात राजकीय स्थिरता येणार?

मोहम्मद युनूस आणि तारिक रहमान यांच्या बैठकीकडे बांगलादेशातील एक मोठा राजकीय बदल म्हणून पाहिले जात आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष बनलेल्या बीएनपी आणि युनूस सरकारमधील समन्वय बांगलादेशला राजकीय स्थिरता देऊ शकतो. त्यातच पक्षाने रहमान यांच्या लंडनहून परतण्याचे संकेतही दिले आहेत. शेख हसीना यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर तारिक लंडनमध्ये राहत होते. ऑगस्ट 2024 मध्ये हसीना यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.