‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी रोखले अजितदादांचे भाषण, शेतकरी कर्जमाफीप्रकरणी विचारला जाब
Marathi June 15, 2025 09:24 AM

गणेश कला क्रीडा रंग मंच येथे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित पुणे मॉडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या शुभारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करण्यास उभे राहताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रश्नांच्या मुद्दय़ावर विचारणा आणि घोषणाबाजी करत त्यांचे भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी कार्यकर्त्यांचे बोलणे ऐकून घेत उत्तर दिल्यानंतरही कार्यकर्ते बाहेर जात नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये यावेळी हा प्रसंग घडल्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून माजी मंत्री बच्चू कडू, गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे. पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या मान्य होणार किंवा नाही, सरकारकडून काय पावले उचलली जात आहे यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून प्रहार संघटनेच्या पुण्यातील दिव्यांग कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार भाषणाला उभे राहताच जोरकसपणे त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांचे भाषण रोखण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी पाठोपाठ दिव्यांग महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली असता, पवार यांनी कार्यकर्त्यांना त्यांचं म्हणणे मांडू द्यावे, म्हणून त्यांना सोडण्यास सांगितले. तसेच पवार यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देखील त्यांच्या आंदोलनाबाबत लक्ष ठेऊन आहे असे सांगितले. मात्र कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेर पवार यांनी पोलिसांना आदेश देत कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर नेण्याचे आदेश दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.