
भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत सायंकाळी साडेचार वाजता केमिकल साठवलेल्या गोदामात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत एकूण बारा गोदाम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वळ ग्रामपंचायत भोईर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील आठ गोदामांत मोठ्या प्रमाणावर केमिकल ड्रम व पावडर साठवलेल्या ठिकाणी सर्वप्रथम आग लागली. गोदामात केमिकल असल्याने आग झपाट्याने वाढत गेली. पाहता पाहता आगीच्या भक्ष्यस्थानी 12 गोदाम गेल्याने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. गोदामात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकल असल्याने या संपूर्ण परिसरात उग्रवास व धुराने नागरिकांना डोळे चुरचुरणे व श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी आय दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण आगीची व्याप्ती वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्यासुद्धा पाचारण करण्यात आल्या. अंजूरफाटा ते दापोडा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी असल्याने पाणी घेऊन येणारे टँकर घटनास्थळी दाखल होण्यास अडचण निर्माण होत होती.
आगीचे कारण अस्पष्ट
नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी येथील गर्दी नियंत्रणात आणली. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पण ही आग आटोक्यात येण्यास अजून किती वेळ लागणार हे सांगता येणार नाही, अशी माहिती अग्निशमन जवान विजय जाधव यांनी दिली आहे.