पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालत शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू एक आठवड्यापासून उपोषणाला बसले आहेत. येत्या 16 तारखेपासून त्यांनी पाण्याचा देखील त्याग करणार असल्याचा निर्धार केला आहे. यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात अजित पवार यांच्या भाषणादरम्यान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. त्यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पाठवले आहे. आम्हीही ते टीव्हीवर पाहिले. बच्चू कडू हे मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलले आहेत. असे सांगत शेतकऱ्यांनी आणि बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
प्रहार संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले की, “आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांपासून कुठेही बाजूला गेलेलो नाही. लाडक्या बहिणींना ६५ हजार कोटी आम्ही देत आहोत. काही गोष्टी चर्चेचा भाग असतात. काही ठिकाणी समंजस भूमिका घेतली पाहिजे. या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. त्या टप्प्याटप्प्याने करायच्या आहेत.”
प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग अंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. बच्चू कडू यांच्या मागण्या धोरणात्मक आहेत. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल, आर्थिक तरतूद करावी लागेल, त्यानंतरच निर्णय शक्य आहे. असे मत महसूलमंत्री आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंची भेट घेऊन सांगितले.
बावनकुळे यांनी शुक्रवारी मोझरी येथे जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. अन्नत्याग अंदोलन तुर्तास मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करा, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला. यावर बच्चू कडू यांच्या पत्नी संतप्त झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस उपवास करावा आणि त्यानंतर अमृता वहिनींना कसे वाटते हे विचारा, असे त्यांनी बावनकुळेंना सुनावले.
दरम्यान, बच्चू कडू हे शनिवारी दुपारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठेरवली जाणार आहे. तत्पूर्वी त्यांनी 16 तारखेपासून पाणीही पिणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे बच्चू कडू हे आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेत नाहीत. कर्जमाफीची तारीख जाहीर करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.