कांदळवनांची कत्तल करून फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याचा भाजप नेत्यांचा डाव उधळला, हरित लवादाच्या आदेशानंतर केगाव खाडीतील भराव काढला
Marathi June 15, 2025 11:24 AM

हजारो कांदळवनांची कत्तल करत जैवविविधतेचा मुडदा पाडून केगावच्या खाडीत पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा घाट भाजपच्या काही नेत्यांनी आखला होता. मात्र हरित लवादाच्या तडाख्यानंतर हा डाव उधळला गेला आहे. कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठा फौजफाटा लावून या खाडीतील 100 मीटरपर्यंत समुद्रात केलेला दगड-मातीचा भराव काढून टाकला आहे. या कारवाईनंतर पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

केगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावरील सर्व्हे नंबर 238 नेम 12 मध्ये उरण-पनवेलच्या काही भाजप नेत्यांनी पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा घाट घातला होता. मुंबईहून पर्यटकांना समुद्रमार्गे ने-आण करण्यासाठी स्पीड बोटीसाठी जेट्टी उभारण्याचीही योजना होती. यासाठी सत्तेचा गैरवापर करून समुद्रातच 100 मीटर खोल 2.5 मीटर रुंद व एक मीटर उंचीपर्यंत दगड, मातीचा भराव टाकला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून केलेल्या या बेकायदेशीर भरावासाठी मोठ्या प्रमाणावर मॅन्ग्रोजची कत्तल करण्यात आली होती. याप्रकरणी स्थानिक व मच्छीमारांच्या तक्रारीनंतर स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे तक्रार दाखल केली होती.

वनविभाग आणि कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीनेही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र कारवाई करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. यामुळे नंदकुमार पवार यांनी पुण्यातील राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाकडे दाद मागितली होती.

माशांचे प्रजनन स्थान मोकळे
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर कांदळवन विभागाने सलग तीन दिवस पोकलेन, जेसीबी, डंपर लावून कारवाई करून दगड, मातीचा भराव काढून जागा पूर्ववत केली आहे. अशी माहिती वनविभाग मॅन्ग्रोज सेलचे अधिकारी किशोर सोनवणे यांनी दिली. यामुळे माशांची प्रजनन स्थानेही मोकळी झाली आहेत. तसेच पर्यावरणाचा होणारा हास व स्थानिक मच्छीमारांनाही त्याचा फायदा होण्यास मदतच मिळणार असल्याचे नंदकुमार पवार यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.