परीक्षेचा निकाल जाहीर : ‘टॉप-10’मध्ये 9 मुले व 1 मुलगी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीट-युजी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून राजस्थानचा महेश कुमार या परीक्षेत अव्वल ठरला आहे. तर मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) शनिवारी ही माहिती दिली. टॉप-10 मध्ये 9 मुले आणि एक मुलगी आहे. तर टॉप-100 विद्यार्थ्यांनी 99.9 पर्सेंटाइल मिळवले आहेत. देशपातळीवर 12 लाखांहून अधिक विद्यार्थी क्वालिफाय ठरले आहेत. एकूण 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षार्थी ‘नीट’च्या अधिकृत वेबसाईटवरून आपले स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. परीक्षेचा अधिकृत निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘नीट’च्या अधिकृत वेबसाईटचा आधार घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी ‘एनटीए’ने शनिवारी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून एनईईटी युजी परीक्षा 2025 ची अंतिम उत्तरपत्रिका जारी केली. ‘एनटीए’ने 4 मे रोजी एनईईटी युजी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. गेल्यावर्षी परीक्षार्थींची संख्या 23.33 लाखांहून अधिक होती. निकालासोबतच गुणवत्ता यादी, कट-ऑफ आणि स्कोअरकार्ड देखील जाहीर केले जाणार असल्याचे समजते.