मुंबई: नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली.आरोपींनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा करून विश्वास संपादन करत होते, अशी माहिती सीबीआयने शनिवारी दिली. आरोपींनी अनेक विद्यार्थी व पालिकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये संदीप शहा (सोलापूर) आणि सलीम पटेल (नवी मुंबई) यांचा समावेश असून त्यांना अनुक्रमे 9 आणि 10 जून रोजी मुंबई आणि सांगली येथून अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.
सीबीआयने 9 जूनला याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींनी नीट युजी 2025 परीक्षेतील कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालकांकडून मोठी रक्कम उकळली, असे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी अनेक विद्यार्थी व पालकांना अधिकाऱ्यांच्या मदतीन गुण वाढवून देण्याचे आमीष दाखवले होते. त्या बदल्यात आरोपींनी मोठी रक्कम घेतल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. आरोपी पालकांवर प्रभाव टाकण्यासाठी परळ परिसरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये पालकांची भेट घ्यायचे. संदीप शहा याने विद्यार्थ्यामागे प्रत्येकी तब्बल 90 लाख रुपये मागितले होते.
मात्र, चर्चेनंतर ही रक्कम 87 लाख 50 हजार रुपये स्वीकारण्यास होकार दिला होता. निकाल जाहीर होण्याच्या सहा तास आधी त्यांना वाढवलेल्या गुणांची माहिती मिळेल, असे आश्वासन दिले होते. या व्यवहारात संदीप शहा नियमितपणे नवी मुंबईतील शिक्षण सल्लागार संस्थेचे संचालक सलीम पटेल याच्या संपर्कात होता. तसेच पुण्यातील आणखी एका सल्लागार संस्थेशी देखील त्याचे संबंध होते, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली असता संभाव्य उमेदवारांची यादी, त्यांचे पट क्रमांक, प्रवेशपत्र, ओएमआर शीट तसेच हवाला चॅनेलच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडले आहेत, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही 16 जूनपर्यंत सीबीआयच्या कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सध्यातरी कोणताही सरकारी अधिकारी किंवा एनटीए कर्मचारी यांचा सहभाग आढळला नसल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. सध्या सीबीआय आरोपींच्या कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शोध घेत आहे.
आणखी वाचा